मुंबई | Sushama Andhare’s First Reaction On Sanjay Raut Getting Bail – शिवसेनेचे वाघ असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्याप्रकरणी त्यांना 31 जुलै 2022 रोजी अटक करण्यात आली होती. तसंच आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या परतण्यानं शिवसेनेत (Shivsena) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांनी ट्विट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी राऊतांना जामीन मिळताच भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “टायगर इज बॅक, शेर वापस आया है इसलिए हम सब खुश है. हा आमच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. कारण आमच्या कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य फार मोठं बालंट ज्याच्यावर आलं त्या सगळ्यातून काहीही झालं तरी मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही हे ठामपणे सांगणारा आमचा नेता परत आलेला आहे.”
“जेव्हा लढाई चालू असते तेव्हा सेनापती आणि सरदार असणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी आमच्यासाठी आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे की, बाळासाहेब ठाकरेंचा लढाऊ सरदार कसा असला पाहिजे. याच घटनेनं आम्हाला अजून एक गोष्ट शिकवली की जे लोक सुखात सोबत असतात ते खरे नसतात जे दु:खात सोबत असतात तेच खरे असतात”, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “ज्या चाळीस लोकांनी थोडा धीर धरला असता, विश्वास ठेवला असता तर काय झालं असतं. पण ज्याला कर नाही त्याला डर कशाला. पण जे गेले ते फाॅल्टी असल्यानं तिकडे गेले आणि वाट्टेल ते बरळत गेले. त्यांना वाटतं की शिवसेना संपली पण शिवसेना संपत नाही. चाळीस काय असे कितीही गेले तरी शिवसेना परतण्याची ताकद देते. त्यामुळं राऊतांसारखे सरदार आमच्यासोबत आहेत तोपर्यंत आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. हा राज्यातील सर्व शिवसैनिकांसाठी संदेश आहे”, असंही अंधारे म्हणाल्या.