सुशीलकुमारांनी जागवल्या ‘ क्रांतिकारी निर्णया’ च्या रम्य आठवणी…
पुणे : ‘आंतरजातीय विवाह हा आजही किती कष्टप्रद आहे. याची जाण आपल्या सर्वांनाच आहे, परंतु 52 वर्षांपूर्वी ढोर समाजातील एका उमेदवाराने ब्राह्मण समाजातील कन्येशी केलेला विवाह हा सामाजिक समतेच्या – समरसतेच्या क्रांतीचा पाया रोवणारा ठरला होता आणि तीच माझ्या शुभंकर, समृद्ध जीवनाची नांदी होती’ ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या लग्नाच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त दैनिक राष्ट्रसंचार शी मनमोकळा संवाद साधला !
प्रेम असलं की कुठलीही जात आडवी येत नाही, हे या महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या भूमी चे वैशिष्ट्य आहे. कुठलीही शाश्वत नोकरी उत्पन्नाचा स्त्रोत नसतानादेखील माझ्या सारख्या वर त्यावेळी उज्वला ने प्रेम केले आणि विश्वास दाखवला त्याची मधुर फळे आम्ही पुन्हा जीवनभर एकत्र अनुभवली .
_ सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे आणि उज्वलाताई शिंदे यांच्या लग्नाला आज एक मे रोजी 52 वर्षे पूर्ण होत आहेत. पाच दशकांच्या या अथक प्रवासानंतर सुशीलकुमार थोडेसे वानप्रस्थाश्रमा च्या मार्गाला झुकलेले दिसतात, पुण्यातील प्रभात रोडवरील त्यांच्या ‘रसिकतेच्या प्रत्यय आणून देणाऱ्या प्रशस्त टेरेस लॉन’ वर भावूक होऊन ते आपल्या आठवणींना उजाळा देत होते. दगदगीच्या पूर्णवेळ राजकारणापासून थोडेसे दूर झाल्यानंतर देखील आजही ते सतत पुणे , मुंबई , दिल्ली अशा प्रवासात आपल्या अनेक सामाजिक, राजकीय, प्रकाशकीय आणि साहित्यिक मित्रांच्या सहवासामध्ये आयुष्याचे सुंदर क्षण जगत आहेत. या प्रदीर्घ वाटचालीमध्ये आपली पत्नी उज्ज्वला शिंदे यांची त्यांना भरभक्कम साथ लाभली. या पाच दशकांच्या प्रदीर्घ प्रवासाचे चिंतन करत असताना आज शिंदे साहेबांनी अनेक आठवणींना उजाळा दिला . त्यानी सांगितले की, एक मे हा महाराष्ट्र दिन असतो , क्रांतिकारकांचा दिन, कामगारांचा दिन असतो परंतु खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये यादिवशी क्रांतीची बीजे रोवली गेली . त्या काळात आंतरजातीय विवाह करणे आणि त्यात पुन्हा ब्राह्मण समाजाच्या घरातील मुलीशी लग्नाचा विचार करणे हे किती दुरापास्त असू शकते याची कल्पना आपण करू शकता. परंतु प्रेम असलं की कुठलीही जात आडवी येत नाही, हे या महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या भूमीचे वैशिष्ट्य आहे . कुठलीही शाश्वत नोकरी, उत्पन्नाचा स्त्रोत नसतानादेखील माझ्या सारख्यावर त्यावेळी उज्वला ने प्रेम केले आणि विश्वास दाखवला त्याची मधुर फळे आम्ही पुन्हा जीवनभर एकत्र अनुभवली. आयुष्याच्या प्रत्येक चढ-उतारामुळे तिने मला खंबीर साथ दिली. खरंतर तिचे घराणे अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि उच्चकुलीन समजले जात होते. अशात देखील माझ्यासारख्या धडपडणाऱ्या तरुणावर सर्वांनीच विश्वास ठेवला आणि तिचा हात मी मोठ्या विश्वासाने हातात घेतला . आज पाच दशकांचा हा अविरत प्रवास आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी आहे.