मुंबई | Sushmita Sen Talk About Her Marriage – बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुष्मिता सेननं बाॅयफ्रेंड रोहमन शाॅलशी ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरूवारी (14 जुलै) संध्याकाळी एक ट्विट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याची कबुली दिली आहे. पण प्रत्यक्षात लग्न न करण्यामागे सुष्मिताचं वेगळंच कारण आहे. याबाबत तिनं खुलासा केला आहे.
वयाची 45शी ओलांडल्यानंतरही सुष्मितानं लग्न केलं नाही. पण लग्न न करण्याबाबत सुष्मितानं खुलासा केला आहे. गेल्याच महिन्यात ट्विंकल खन्नाच्या टाॅक शोमध्ये सुष्मितानं हजेरी लावली होती. यावेळी सुष्मितानं तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलताना म्हटलं की, “मला मुलं आहेत म्हणून मी आजवर लग्नच केलं नाही असं लोकांना वाटत असेल. पण यामागचं कारण काही वेगळंच आहे. रेनीला मी दत्तक घेतलं. पण त्यानंतर माझं पहिलं प्राधान्य कोण असेल? हे समजून घेणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली नाही. कोणी जबाबदारी सांभाळावी अशी माझी अपेक्षा नाही. पण मी माझ्या मुलींपासून लांब राहू शकत नाही. माझ्या मुलींना माझी गरज आहे.”
तसंच सुष्मिताने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, “नशिबाने माझ्या आयुष्यामध्ये चांगली मुलं सुद्धा आली. पण मी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही कारण मी ज्यांची निवड केली तेच माझ्यावर नाराज होते. यामध्ये माझ्या मुलींचा काही दोष नाही. माझ्या मुली कधीच माझ्या नात्याआड आल्या नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तींचा त्यांनी आदर केला आहे.”