व्हायोलिन अॅकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २ व ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे सातव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा व्हायोलिन अॅकॅडमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी आज प्रभात रस्त्यावरील सीसी अँड कंपनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केली.
पुणे – Pune News | स्वरमल्हार महोत्सवाच्या या परिषदेत स्वरझंकार, स्वरमल्हार, स्वरमैफिल आणि स्वर दीपावली या महोत्सवांचे आयोजक तेजस व राजस उपाध्ये उपस्थित होते. पं. अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, १९५१ साली स्थापन झालेल्या व्हायोलिन विद्यालयाला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर या विद्यालयाची स्थापना करणारे माझे वडील स्व. बाळकृष्ण शंकर उपाध्ये यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. असा दुहेरी योग साधून हे वर्ष आम्ही व्हायोलिनचे वर्ष म्हणून साजरे करणार आहोत. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून, त्याची सुरुवात येत्या २ व ३ जुलै रोजी होणार्या ‘स्वरमल्हार’द्वारे होणार आहे.
पं. उपाध्ये पुढे म्हणाले, व्हायोलिन’चा इतिहास ७०० वर्षांचा आहे. साधारण २०० वर्षांपूर्वी व्हायोलिन हे भारतात पहिल्यांदा कर्नाटक आणि गोवा येथे आले आणि शंभर वर्षांपूर्वी ते उत्तर हिंदुस्थानी संगीतात आले. त्यामुळे ७० वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर, व्हायोलिनला संगीत क्षेत्रात येऊन ३० वर्षे झाली होती आणि त्यामध्ये निरनिराळ्या शैलींचा समावेश कसा करता येईल, यावर अभ्यास करण्यासाठी एक संशोधन आणि विकास केंद्र असावे, या हेतूने वडिलांनी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन घेत यावर काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच प्रयत्नांना हळूहळू यश मिळत गेले आणि संस्थेने प्रशिक्षित केलेल्या युवा व्हायोलिन वादकांना पुरस्कार मिळू लागले. गेल्या ७० वर्षांत विद्यालयाने प्रशिक्षित केलेल्या ७ युवा व्हायोलिन वादकांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे.’’
पं. उपाध्ये म्हणाले, यंदा व्हायोलिन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या कलाकारांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा पं. बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पुरस्कार आणि दाजीकाका गाडगीळ रसिकाग्रणी पुरस्कारही यंदा दिला जाणार आहे. संस्थेतून व्हायोलिन शिकलेल्या नामांकित कलाकारांचे कार्यक्रम, उदयोन्मुख कलाकारांसाठीचा ‘रायझिंग स्टार’ कार्यक्रम, कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम, व्हायोलिन आणि विविध वाद्यांची जुगलबंदी कार्यक्रम, व्हायोलिन अॅकॅडमीच्या अद्ययावत संशोधन केंद्राच्या कामाची सुरवात असे विविध कार्यक्रम
होणार आहेत.