उज्ज्वला ॲण्डरसन (चाफळकर), स्वीडन
साधारणपणे हजार बाराशे वर्षांपूर्वी स्वीडिश भाषा रून नावाच्या लिपीत दगडांवर कोरली जायची. रून लिपी आजच्या आधुनिक स्वीडिश भाषेच्या लिपीपेक्षा खूप वेगळी होती. त्या काळातले रून लिपीत कोरलेले दगड आजही स्वीडन आणि डेन्मार्क या देशात पाहायला मिळतात.
जेव्हा रून लिपी कोरलेला दगड सर्वप्रथम मी पहिला तेव्हा माझ्या मनात अतिशय कुतूहल निर्माण झाले. लंबवर्तुळाकारातले हे साधारण माणसाच्या उंचीएवढे शानदार पद्धतीने उभे असलेले दगड कधी शेतांच्या कडेला, तर कधी छोट्या गावांमध्ये आढळतात. जवळ जाऊन निरीक्षण केल्यास असे दिसून येते की, त्यावर अगदी कलात्मक रीतीने एक प्रकारची लिपी कोरलेली आहे आणि त्या लिपीतली अक्षरं जुन्या काळातली असल्याने आपल्याला वाचता येत नाहीत. पुष्कळवेळा या दगडांच्या शेजारी त्याचे भाषांतर केलेली एक पाटी आढळते आणि त्यावरून आपल्याला कळते की, या दगडावर काय लिहिले असावे.
या दगडांना रूनस्टोन्स किंंवा रून दगड असे म्हणतात. साधारण असे २५०० दगड स्वीडनमधल्या वेगवेगळ्या भागांत सापडलेले आहेत आणि डेन्मार्कमध्येसुद्धा काही ठिकाणी असे दगड सापडतात. त्या काळात स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वे या तिन्ही देशांतली भाषा एकच होती.
काही दगड त्यांच्या मूळच्याच स्थानी आहेत तर काहींना त्यांची चांगली निगा राखली जावी म्हणून जवळच्याच एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहे. हे दगड कुठल्या काळात कोरले गेले, त्यावरची लिपी कोणती आहे आणि ते कुणी उभे केले हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतोच.
दगड साधारण हजार वर्षांचे आहेत. म्हणजे इसवीसनानंतर ८०० ते १००० या वर्षात कोरलेले आहेत. त्या काळात स्वीडनमध्ये वायकिंग नावाची लोकं राहायची आणि त्यांनी हे दगड कोरलेले आहेत.वायकिंंग लोकांमध्ये वेगळे प्रकार होते. काही शेती करायचे तर काही जगातल्या इतर देशात जाऊन व्यापार करायचे.काही देशाबाहेर जाऊन चाचेगिरीसुद्धा करायचे.
आजरून लिपी कळणारे संशोधक या दगडांवर काय लिहिले आहे हे जेंव्हा सांगतात तेंव्हा आपले मन हजारो वर्षांपूर्वीच्या काळात जाते. त्या काळातल्या लोकांच्या राहणीमानाबद्दल कुतूहल निर्माण होते.
दगडांवरचा मजकूर त्या जागी पूर्वी असलेल्याघरांचीआणि त्यांच्या मालकांची माहिती देतो.एखादामालककिती श्रीमंतआणि मोठा होता, तो काय करत असे याबद्दल माहिती सांगतो. कधीतरी एखद्या माणसाने केलेल्याप्रवासाचेवर्णनसुद्धा काही ठिकाणी वाचायला मिळते. थोडक्यात म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जगलेल्या माणसांना आपण कोण होतो, काय करत होतो आणि कसे रहात होतो हे पुढच्या जमान्याला सांगायची इछ्या होती आणि त्यांनी ती रून स्टोन्स वर कोरून व्यक्त केली आणिती सफल झाली. अद्यावतम्हणजे १००० वर्षानंतर सुद्धा आपल्याला त्याचा ठळक पुरावा मिळतो.