पुणे : शिवसेना आमदार आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणी त्यांचे समर्थक यांनी गेल्या सहा दिवसांपासून शिवसेनाविरोधात बंड केलं आहे. दिवसेंदिवस बंडखोर आमदारांमध्ये शिवसेना आणि इतर पक्षांतील आमदारांची भर पडत आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी त्या आमदारांची इच्छा आहे. मात्र शिवसेना प्रमुख त्यासाठी तयार नाहीत. त्यामुळं शिंदे गटाकडून आमची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याचं बोलल्या जात आहे. त्यामुळं राज्यभरातील शिवसैनिक संतापले आहेत.
राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलने आणि घोषणाबाजी करत आहेत. पुण्यात तर एकनाथ शिंदे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्राच शिवसैनिकांनी काढली आहे. पुण्यातील टिंबर मार्केटपासून रामोशी गेट पर्यंत पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांची अंत्ययात्रा शावावाहीकेतून काढण्यात आली आहे.
“आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या सर्व देशद्रोही आणि बंडखोर आमदारांवर कारवाई होईल. त्यांच्या कार्यालयावरही हल्ला केला जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही.” असं संजय मोरे म्हणाले.
बंडखोर आमदार पंगतीतले कावळे, बंडखोर आमदार डोम कावळा असे फलक शिंदे यांच्या प्रतीकात्मक शववाहिकेवर लावण्यात आले आहेत. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. पुणे, मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणी शिवसैनिक आंदोलने आणि घोषणाबाजी करत आहेत.