इस्रायलने सीरियाची (Syria) राजधानी दमास्कससह देशभरात जोरदार हवाई हल्ले केले आहेत. दरम्यान, दमास्कस बारजेह भागात इस्रायलने (Israeli strikes) केलेल्या हल्ल्यात सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे संशोधन केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिले आहे. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सच्या माहितीनुसार, “इस्रायली लढाऊ विमानांनी काल सुमारे १०० हून अधिक हल्ले केले. हे हल्ले बारजेह वैज्ञानिक संशोधन केंद्रावरही झाले.” असद राजवट संपुष्टात आल्यानंतर कट्टरपंथीयांच्या हाती शस्त्रे लागू नयेत, यासाठी हे हल्ले केले असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी २०१८ मध्ये या ठिकाणी हल्ला केला होता. त्यावेळी सांगण्यात आले होते की, हे ठिकाण सीरियाच्या रासायनिक शस्त्रांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित आहे.सीरीयातील बंडखोरांनी (Syria Civil War) राजधानीचे शहर दमास्कसवर नुकताच ताबा मिळवला. त्यांनी एक एक करत सीरीयातील सर्व शहरांवर कब्जा केला आहे. यामुळे सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी देशातून पलायन केले. त्यांनी रशियात आश्रय घेतला असल्याचे वृत्त आहे.
अल असद कुटुंब गेली ५४ वर्षे सातत्याने सीरियात सत्तेत होते. ५४ वर्षांची ही अव्याहत राजवट रविवारी संपुष्टात आली. अकरा दिवसांपासून सुरू असलेले युद्धही रविवारीच संपुष्टात आले.
मुख्य बंडखोर गटाचा नेते अबू मोहम्मद अल-जोलानी यांनी दमास्कसमधील त्यांच्या पहिल्या सार्वजनिक भाषणात, असद यांचे सरकार पाडणे हा संपूर्ण इस्लामिक राष्ट्राचा विजय असल्याचे म्हटले. जोलानीच्या एचटीएस गटाच्या नेतृत्वाखालील बंडखोर हे अल कायदाशी संलग्न आहेत. अल्पसंख्याकांची सुरक्षा केली जाईल, असे जोलानी यांनी म्हटले आहे.