पुणे – Global Award Winner School Bopkhel | शहरी भागातील शाळांना मिळणार्या सोयी आणि सवलती, तसेच पालकांकडूनही मिळणारे आर्थिक बळ यापैकी काही नसताना बोपखेल येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. शाळेला ‘सर्वोत्तम शाळा’ (Global Award Winner School In Pune) असा पुरस्कार मिळाला असून देशात ही शाळा ‘लै भारी’ ठरली आहे.
समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल जगभरातील शाळांचा गौरव करण्यासाठी इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ (T4 Education) या संस्थेमार्फत दिला जाणारा सर्वोत्तम शाळा पुरस्कार बोपखेल येथील शाळेला मिळाला आहे. या शाळांना २,५०,००० डॉलर्सचे बक्षीस जाहीर झाले आहे. जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी विविध श्रेणींमध्ये भारतीय शाळांना टॉप १० शॉर्टलिस्टमध्ये नाव देण्यात आले.
महापालिकेच्या प्राथमिक इंग्रजी बोपखेल शाळा गेल्या सहा वर्षांपासून आकांक्षा फाउंडेशन चालवत आहे. या संस्थेत २५ जणांचा शिक्षकवृंद आहे. ३१६ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेत झोपटपट्टी, वाड्या-वस्तीमधील ज्युनिअर केजीपासून ते इयत्ता सहावीपर्यंत मुलांना शिक्षण दिले जाते. मुंबईतील खोज स्कूल आणि पुण्यातील बोपखेल येथील पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूल या ‘कम्युनिटी कोलॅबोरेशन’ (community collaboration) श्रेणीतील बक्षिसांसाठी निवडलेल्या टॉप १० शाळांमध्ये आहेत.
जगातील सर्वोत्तम शाळांना दिल्या जाणार्या पुरस्काराच्या नामांकन यादीत पिंपरी चिंचवड महापालिका इंग्रजी बोपखेल शाळेचे नाव जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी शाळेने पहिल्या दहांत स्थान मिळविले आहे. असा पुरस्कार मिळवणारी देशातील ती पहिलीच एकमेव शाळा ठरणार आहे.
‘पुनरावलोकन पॅनेल’द्वारे जगभरातील शाळांमधील हजारो अर्जांची फेरतपासणी केल्यावर आकांक्षा पिंपरी-चिंचवड महापालिका इंग्रजी माध्यम बोपखेल शाळेची निवड करण्यात आली. ‘समुदाय सहयोग’ या श्रेणीअंतर्गत त्यांची निवड झाली. त्यामुळे बोपखेलच्या शाळेचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.