आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास कमी पडत आहोत. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून आधीच प्रयत्न करणे गरजेचे असते. म्हणूनच शरीराला तुम्ही चांगला व्यायाम दररोज देत असाल तर शरीर निरोगी राहीलच, त्याचबरोबर शरीर आजारी होण्याचे प्रमाण खूप कमी होईल. आजपासून आपण पाहणार आहोत योगासने आणि त्याचे शरीराला होणारे फायदे. आज आपण ताडासनामुळे शरीराला आणि मनाला होणारे फायदे कोणते, ते पाहुयात…
आजचे पहिले आसन ताडासन. ताडासन कसे करावे? ताडासनाचे शरीराला होणारे फायदे कोणते?
ताडासन कसे करावे?
१. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून किंवा दोन्ही पायांमध्ये थोडेसे अंतर ठेवून जमिनीवर किंवा योग मॅटवर सरळ उभे राहा.
२. हातांच्या बोटांची गुंफण करीत श्वासोच्छवास सुरू ठेवत दोन्ही हात हळूहळू वरच्या बाजूस न्यावेत.
३. आता पायांच्या टाचा वर उचला आणि पायांच्या बोटांवर उभे राहून शरीराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. हे करीत असतानाच पायांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर वरच्या बाजूस स्ट्रेच करावे.
४. ताडासनाच्या या अंतिम स्थितीत आपापल्या क्षमतेनुसार राहावे. त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यावे.
वरील पद्धतीने ताडासन पुन्हा करावे. तुमच्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त आसन होल्ड करण्याचा
प्रयत्न करावा.
- ताडासन करताना हात आणि पाय ताठ ठेवावेत. कधीही वाकवू नयेत.
- आसनस्थिती श्वास घेऊन रोखून ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- आसन सोडताना हळूहळू श्वास सोडत पूर्वस्थितीत यावे.
- ताडासन तुमच्या क्षमतेनुसार तीन ते पाच वेळा करू शकता.
ताडासनाचे फायदे कोणते
- शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी या आसनाची फार मदत होते.
- ताडासन करताना मणक्याचा पूर्ण भाग ताणला जातो आणि सैल सोडला जातो.
- त्यामुळे पाठीच्या मज्जातंतूंवरील ताण कमी होण्यास मदत होते.
- हाडांची वाढ योग्यरीत्या होते.
- मुलांची उंची वाढण्यासाठीही ताडासन करण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलांनी उंची वाढण्यासाठी ताडासन करावे.
- ओटीपोटातील स्नायू ताणले जातात. स्त्रियांचे ओटीपोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
- या आसनामुळे शरीरातील सर्व स्नायू ताणले जातात. सर्व शरीरभर रक्ताभिसरण चांगले होते.
- हाडे मजबूत होतात. पायाचे आरोग्य सुधारते.
- शरीरातील सांधे मजबूत होतात.
- सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
- ताडासनाचे असे बरेच फायदे आहेत.
ताडासन करण्याची योग्य वेळ
या आसनाचा सराव तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पण अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर २ ते ३ तास आसन करू नये. सकाळी उठल्यानंतर ताडासन केल्यास ते शरीरासाठी जास्त लाभदायक ठरते. जर तुम्ही व्यायामाला सुरुवात करणार असाल तर हळूहळू योगासनाची प्रॅक्टिस करावी. त्यामध्ये ताडासन हे खूप साधे-सोपे आसन आहे.
कंटाळा न करता व्यायामाला सुरुवात करा. ताडासन जरूर करून पाहा. स्वस्थ राहा, आनंदी राहा!
_विदुला कुलकर्णी