ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी; परिसरात कडक सुरक्षा

ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी

आग्रा येथील ताजमहाल बॉम्बने उडवून देवू, असा धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी पथक ताजमहल परिसरात दाखल झाले असून येथील सुरक्षा व्‍यवस्‍थेतही वाढ करण्‍यात आली आहे.

“पर्यटन विभागाला ईमेल प्राप्त झाला. त्याआधारे ताजगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती ताजमहल सुरक्षा एसीपी सय्‍यद अरीब अहमद यांनी सांगितले. ताज महलच्‍या सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत कडकोट करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकही येथे दाखल झाले. या तपासणीदरम्यान पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. परिसरात तपासणी केली जात आहे. कोणत्‍याही प्रकारची संशयास्‍पद वस्‍तू आढळलेली नाही, असेही पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

दररोज हजारो पर्यटकांची भेट

शहाजहान आणि मुमताज यांच्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. यामध्ये परदेशी पर्यटकांचीही मोठी संख्या आहे. आग्राच्या कमाईचा मोठा हिस्सा ताजमहाल पर्यटनातून येतो.

दुसरीकडे, उत्तर प्रदेश पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना पाठवण्यात आला आहे, त्या आधारावर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच, आता ताजमहालाला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात. आता ही धमकी कोणी पाठवली, याचा तपास सुरू आहे, असेही दीप्ती वत्स यांनी सांगितले.

Rashtra Sanchar: