तुम्हाला ‘ओळखणारी’ माणसे जपा…

अश्विनी धायगुडे-कोळेकर

आपण माणसं आहोत. साधी सरळ… ज्यांना भावना आहेत… राग, प्रेम, काळजी, चिडचिड, द्वेष, मत्सर, ईर्षा अशा सगळ्याच भावनांनी आपले आयुष्य भरलेले आहे. पण असे असले तरी आपण आपल्या सगळ्याच भावना सगळ्यांसमोर नाही व्यक्त करत. किंबहुना आपण त्या करूच शकत नाही. काही ठराविक लोकांजवळच आपण मोकळे होतो, आपल्या सगळ्या भावना व्यक्त करतो. ते म्हणतात ना, ‘आपण प्रत्येक जण भावनिक पातळीवर निवांत होण्याच्या जागा शोधत असतो. एक हक्काची जागा… हक्काच्या व्यक्तीच्या हृदयाजवळची जागा.’ कारण ही भावनिक पातळीवरील पोकळी दर्शविणारी ही रिकामी जागा प्रत्येकालाच भरता येते, असे नाही. त्यासाठी वेगळे कसब असावे लागते. माणूस जपण्याचे कसब, त्याची सुख-दुःखे आपली मानण्याचे कसब… त्याच्या भावना समजून घेऊन त्या जपण्याचे कसब, प्रसंगी त्याला सांभाळण्याचे कसब, तर प्रसंगी आरसा दाखवण्याचे कसब. यातही पुन्हा केवळ दाखविण्यापुरता भावनिक ओलावा जपण्याचे कसब’ असणारी एक वेगळीच जमात’ प्रत्येकाच्या आजूबाजूला असते. त्यांच्या इतके वाइट मुखवटे लावणारे लोक शोधूनही सापडणार नाहीत. त्यांच्यापसून तर शक्य तितके जपून राहणेही तितकेच गरजेचे असते, कारण त्यांचा मुखवटा गळून पडला तर त्याचा त्रास त्यांच्यापेक्षा जास्त आपल्यालाच होतो. कारण आपण त्या खोट्या मुखवट्यांवर विश्वास ठेवतो.

तर एकूणच अनेक जण बाहेरच्या जगात किंवा कामाच्या ठिकाणी अनेक मुखवटे लावून जगत असतात… कधी शहाणे’ असल्याचा मुखवटा तर कधी वेडे असल्याचा, कधी भावनिक असल्याचा, तर कधी फार प्रोफेशनल’ असल्याचा मुखवटा. कित्येकदा तर आपल्यालादेखील असा मुखवटा लावावा लागतो. पण या मुखवट्यांमागचे खरे आपण’ फार कमी लोकांना माहीत असतो… ज्यांना आपण खरेखुरे कसे आहोत, हे नक्की माहिती आहे, अशी माणसे जपता यायला हवीत आपल्याला. ज्यांच्यासमोर आपल्याला आपण ‘आहोत तसे…’ अगदी जसेच्या तसे व्यक्त होता येईल… किमान या लोकांसमोर तरी कसलाही मुखवटा लावण्याची गरज आपल्याला पडू नये.

यांच्यासमोर अगदी लहान मुलांप्रमाणे हसता येईल, हट्ट करता येईल, मांडीवर डोके ठेवून रडता येईल… आनंद झाला तर कडकडून मिठी मारता येईल, एखाद्या गोष्टीचा राग आला असेल, तर प्रसंगी शिव्यादेखील देता येतील. एखादा आरसा ज्याप्रमाणे आपल्याला खरेखुरे प्रतिबिंब दाखवतो, अगदी तसेच काहीसे नाते या लोकांसोबत आपल्याला जपता यायला हवे. आता हे काम फार सोपे वाटत असले तरी अजिबातच सोपे नाहीये. कारण यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागते ती म्हणजे तुम्ही त्या माणसांशी, त्या नात्यांशी प्रामाणिक असणे. येथे खर्‍या अर्थाने एक व्यक्ती म्हणून तुमचे कसब पणाला लागते. कारण सगळीकडे मुखवटेच मुखवटे असणार्‍या या जगात आपल्याला या खास लोकांसमोर बिनमुखवट्याचे राहावे लागणार आहे. तुमचे डोळे बघून ज्याला कळेल, की डोळ्यात चमक आहे की पाणी, अशी ही लाखमोलाची माणसे प्रत्येकाला जपता यायला हवीत, तरच माणसा-माणसांमधील नातेसंबंध जपले जातील.

Prakash Harale: