मुंबई : (Taliban NIA mail to bomb Mumbai) मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या ईमेल आयडीवर हा धमकीचा मेल आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल आल्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एनआयएला गुरुवारी रात्री धमकीचा मेल आल्याने देशातील इतर शहरांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. तसंच, मुंबई पोलिसांनाही सूचना देण्यात आली असून पोलिस आणि इतर तपास यंत्रणांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
एनआयएला आलेल्या मेलमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच, मेल करणाऱ्या व्यक्तीने तो स्वतः तालिबानी असल्याचा दावा केला आहे. व तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी हा आदेश दिला असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.
र्वीही मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचे तब्बल २६ मेसेज पाठवले होते. यामध्ये २६/११ सारखा हल्ला होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून या धमकीची माहिती देण्यात आली होती. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विरार परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले.