मुंबई : (Tanaji Sawant On Omicron) चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने जगभरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनमध्ये अवलंबण्यात येत असलेले ‘शून्य कोविड’ धोरण शिथील केल्यानंतर करोनाची नवीन लाट आली असून या लाटेमध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट असलेल्या बीएफ-७ चे आहेत. त्यामुळेच भारतामध्येही या सब व्हेरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात आणि ओडिशामध्ये प्रत्येकी दोन ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट बीएफ-७ ने बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी नागपूरमध्ये आढावा बैठकी घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांना या व्हेरिएंटचं नावही नीट घेता आलं नाही. यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना तानाजी सावंतांना ‘ओमिक्रॉन’ या शब्दाची आठवण करुन द्यावी लागली.
सावंतांना चीनमध्ये थैमान घालणाऱ्या बीएफ-७ च्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस उत्तर देताना सावंत यांनी ओमायक्रॉनचा उल्लेख ‘एमिक्रॉन’ असा केला. त्यानंतर आपला उच्चर चुकल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना या व्हेरिएंटचं नेमकं नाव काय आहे हे नजर आणि देहबोलीमधूनच विचारलं. त्यावर सहकाऱ्यांनी ‘ओमिक्रॉन… ओमिक्रॉन…’ असं म्हणत मदत केल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना या व्हेरिएंटचं बरोबर नाव घेता आलं.सावंतांनी ओमिक्रॉनच्या ऐवजी ‘एमिक्रॉन’ असा उच्चार केला अन् स्वत:च थांबून अधिकाऱ्यांना नेमका शब्द विचारला.