सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांच्या जावयावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयसिंह चक्रपाणी (रा. अनगर, ता मोहोळ,जि. सोलापूर) असे कालिदास सावंत यांच्या जावयाचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश जयसिंह गुंड, जयवंत महादेव थिटे, अक्षय राजेंद्र कारमकर इतर गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तानाजी सावंताच्या थोरल्या भावाची मुलगी अनगर येथे दिली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे आहेत. सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यासह पाच भावांचे त्यांचं कुटुंबीय आहे. यातील थोरले बंधू कालिदास सावंत यांची मुलगी अनगर (ता. मोहोळ) येथील जयसिंह चक्रपाणी गुंड यांना दिलेली आहे.
जयसिंह चक्रपाणी गुंड हे ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा प्रथमेश जयसिंह गुंड यांचा अनगरमध्ये छोटासा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी आमची मका लवकर खरेदी का करत नाही; म्हणून जयसिंह चक्रपाणी गुंड, प्रथमेश जयसिंह गुंड, जयवंत महादेव थिटे, अक्षय राजेंद्र कारमकर या चौघांनी गावातील एक दलित व्यापाऱ्यास शिवीगाळ केली होती. त्यानंतर शिवजयंतीदिनी काही कारणांनी हा वाद उफाळून आला. त्याबाबतचा गुन्हा त्यांच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.