मुंबई | Tanushree Dutta’s Post Viral – बाॅलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तसंच ती काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. काही महिन्यांआधी ती Mee Too प्रकरणामुळे चर्चेत आली होती. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत तिनं बॉलीवूडमध्ये मीटू ची मोहिमच छेडण्यास मोठं कारण दिलं होतं. तसंच आता पुन्हा तनुश्री दत्तानं एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ‘मला छळलं, मला टार्गेट केलं’ असं म्हणत तिनं आपल्यावर झालेल्या अन्यायाची, छळवादाची उदाहरणं पोस्टमध्ये लिहिली आहेत. त्यामुळे तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
तनुश्री दत्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे की, “मी आत्महत्या करणार नाही, मी शेवटपर्यंत लढणार.” तसंच तिनं आपल्या मेडवर देखील तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री म्हणाली, ‘मला खूप त्रास दिला, वाईट पद्धतीनं मला जाणून-बुजून लक्ष्य केलं जातंय. प्लीज, कुणीतरी काहीतरी करा माझ्यासाठी. पहिल्यांदा माझ्यासोबत वाईट घडलं ते बॉलीवूडमध्ये, नंतर माझ्याच घरात काम करणाऱ्या मेडने मला मारण्याचा प्रयत्न केला, नंतर उज्जैनला जाताना माझ्या गाडीचा अपघात. थोडक्यात मी सगळ्यातून बचावले, मुंबईला ४० दिवसांनी परतले आणि माझं नॉर्मल लाइफ जगत होते, तर कुणी दृष्टानं पुन्हा कुरघोडी करत माझ्या घराच्या बाहेर किळसवाणी गोष्ट ठेऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न केला”.
माझ्यासोबत एवढे सगळे वाईट प्रकार घडले, मला बाहेर पडणं देखील लोकांनी मुश्किल केलं तरी मी आत्महत्या करणार नाही, सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. ना मी इथून कुठे जाणार ,ना माझा लढा थांबवणार. मी इथेच राहणार आणि माझं करिअर आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. बॉलीवूड माफिया, महाराष्ट्रातला जुना एक राजकीय गट ज्याची अजूनही दहशत आहे आणि काही गु्न्हेगारी घटक या सगळ्यांचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. मला पक्की खात्री आहे की मी टू ची मोहीम छेडली तेव्हा जे माझ्या समर्थनार्थ समोर आले ते माझ्या पाठिशी आहेत. Mee too चे गुन्हेगार आणि NGO ज्यांचा मी पर्दाफाश केला आहे तेच मला टार्गेट करण्यात, छळण्याच्या मागे आहेत. मी अनेकदा इन्स्टावर पोस्ट करुन आवाज उठवत असते. त्यामुळे कोणत्या न कोणत्या माध्यमातून माझा मानसिक,शारिरीक छळ करण्याचा प्रयत्न केला जातो. असं कसलं हे सोशल मीडिया जिथे तरुण मुला, मुलींनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली की त्यांना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला जातो, किंबहुना मारलंही जातं”, असंही तनुश्री म्हणाली.
पुढे ती म्हणाली, ”मला आशा आहे की आपल्या राज्यात महाराष्ट्रात कायदे कडक होतील.आणि छोट्यातल्या-छोट्या घटनांची दखल घेतली जाईल, त्यावर अॅक्शन घेतली जाईल. सगळंच हाताबाहेर चाललं आहे. माझ्यासारखे सर्वसामान्य भरडले जात आहेत. काहीतरी मोठं इथे घडलं पाहिजे, बदल गरजेचा आहे. आज जिथे मी आहे उद्या तिथे तुमच्यापैकी कुणीही असू शकतं. मला माहितीय मी इन्स्टावर पोस्ट करते, माझं म्हणणं मांडते ते अनेकांना थोतांड वाटत असेल,पब्लिसिटी वाटत असेल, याचा चुकीचा अर्थ काढला जात असेल. पण मला टार्गेट केलं जातंय, माझ्या बद्दल मुद्दाम अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही अशा गोष्टींशी मला जोडलं जात आहे”.
”आता मला माझ्या अध्यात्मातील साधनेनं ताकद दिली आहे. मला माझ्या आयुष्यातील नवीन संधी यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे, हे कृष्णा,माझ्या पाठीशी रहा ”, असं देखील तनुश्री दत्तानं म्हटलं आहे.