मुंबई : वेदांता फॉक्सकॉन (VEDANTA FOXCONN) नंतर आता तब्बल २२ हजार कोटींचा मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यावरून शिंदे फडणवीस सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. टाटा एअरबस (TATA AIRBUS) हा २२००० कोटींची गुंतवणूक असेलला प्रकल्प नागपूर मध्ये होणार होता. मात्र, आता तो प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यामुळे विरोधकांनी महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर मोठी टीका या प्रकरणावरून केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी “खोके सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. तुमचा, माझा आणि उद्योजकांचाही या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे उद्योजक महाराष्ट्रात आणलेले प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत.” अशी टीका केली आहे. “इतर राज्यांतील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येत आहेत. आपापल्या राज्यात प्रकल्प कसे वाढवता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आपले मुख्यमंत्री दहीहंडी आणि दिवाळी यापलीकडे काहीही करत नाहीयेत. गेल्या तीन महिन्यांत हा चौथा मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे.” अशी टीका आदित्य ठाकरेंकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीचराज्यात सत्तांतर
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून चार मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तर, “राज्यात तीन महिन्यांपूर्वीच सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आले. या तीन महिन्यांमध्येच महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला गेले. हे तिन्ही प्रकल्प एकाच राज्यात गेले, हा योगायोग म्हणायचा का? यावरुन एक शंका येते की, महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात आले का, असा प्रश्न माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित केला आहे.