चहाची किंमत ऐकली तर पोटात येईल गोळा

नवी दिल्ली ः जगातील सर्वात महागड्या चहा पावडरचा यू-ट्यूबवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका स्टॉलवर तब्बल १४ लाख रुपये प्रतिकिलो या दराने चहा पावडर विकली जात असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. चक्क सोन्यापेक्षा महाग या चहाने व्हर्च्युअल विश्वात खळबळ माजली आहे.

आसामच्या दार्जिलिंगच्या चहाच्या बागेतला हा चहा विशिष्ट प्रकारे ब्लेंड केलेला असल्याने या चहाची किंमत १४ लाख रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगण्यात येत आहे. टीडब्ल्यूजी असे या ब्रँडचे नाव असून ही कंपनी मूळची सिंगापूरची असल्याचे समजते.

काय आहे टीडब्ल्यूजीच्या चहामध्ये?
असे सांगण्यात येत आहे की, हा चहा पानांपासून नाही तर छोट्या कळ्यांपासून तयार केला जातो. त्यामुळेच या चहाची किंमत इतकी जास्त असते. या चहाची चवदेखील खूपच जबरदस्त असते. सोन्यासारख्या चमकणार्‍या पिवळ्या रंगाच्या या चहाची चव जिभेवर रेंगाळणारी असते आणि शिवाय या चहामध्ये आरोग्याला लाभदायी अनेक गुण असतात. या वैशिष्ठ्यांमुळे या चहाची वेगळी ओळख आहे. खास दर्दी चहाच्या शौकिनांसाठी याचे उत्पादन केले जाते.

टीडब्ल्यूजी चहाने चहाच्या प्रतिकिलोचे सर्व विक्रम मोडले आहेत. गुवाहाटी चहा लिलाव केंद्रातर्फे सांगण्यात येत आहे की, आसामच्या काही बागांमधला विशिष्ट प्रक्रिया केलेला चहा महाग असू शकतो; मात्र १४ लाख रुपये प्रतिकिलो हा दर अविश्वसनीय असाच आहे. आसामचा चहा एरवी जगभर प्रसिद्ध आहेच. आता या आसामच्या चहाच्या किमतीने दराचे सर्व विक्रम मोडले आहेत. आसामचा चहा आपल्या स्वादिष्ट चवीसाठी, सुगंधासाठी आणि रंगासाठी ओळखला जातो

टीडब्ल्यूजी चहा हा आपल्या नावाप्रमाणेच मनाला सुखावणारा, चमकणार्‍या पिवळ्या रंगाचा आहे. या चहाच्या पानांची पावडर बनवल्यावर एक सोनेरी रंग तयार होतो. ऑक्सिडेशनमुळे या प्रक्रियेदरम्यान हिरवा रंग पिवळसर रंगात रुपांतरित होतो, तर सुकल्यावर या चहाच्या कळ्या सोनेरी होतात आणि मग त्यांना काळ्या पानांपासून वेगळे केले जाते. जगभरात हा चहा लोकप्रिय झाला आहे.

Dnyaneshwar: