सतारकावस्तीमध्ये दोन मोटारसायकल्स देऊन शिक्षकांचा सन्मान

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शिष्यवृत्ती, तसेच जवाहर नवोदय प्रवेशपरीक्षेसाठी अग्रेसर असलेल्या उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेटवडी येथील सतारकावस्तीमध्ये सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांमध्ये तब्बल अठरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व चार विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शाळेतील शिक्षिका प्रणोती गावडे-लोंढे व अनिता वाळुंज-शिंदे या दोन शिक्षिकांना पालकांकडून व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे अ‍ॅक्टिव्हा टू व्हीलर गाड्या देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सोपान मांजरे यांनी दिली.


वर्षभर शाळेमध्ये शिष्यवृत्ती, तसेच जवाहर नवोदयचे जादा सराव वर्ग घेतले जातात. त्यामुळेच शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेशपरीक्षेसाठी शाळेचे आतापर्यंत २१३ विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले असून, नऊ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यार्थी व शिक्षकांना दरवर्षी सन्मानित केले जाते. जी. बी. पवळे असोसिएट (मुंबई) यांच्यातर्फे सन्मानचिन्ह व पालकांकडून दोन टू व्हीलर शिक्षकांना देऊन सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय शिंदे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष अजित वाळुंज, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कळमकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, माजी सरपंच द्वारकानाथ टिजगे, सरपंच गौरी पवार, ग्रामपंचायत सदस्य नीलम हिंगे, सुनंदा पवार, किरण पवार, उद्योजक अतुल थिटे, सुभाष हिंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील वाबळे, उपाध्यक्ष रेश्मा हिंगे, छाया पवार, विलास पवार, राजू हिंगे, संजय हिंगे, कारभारी पवार, कवी साहेबराव पवळे, संतोष गाढवे, सुभाष पवळे व सर्व शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Sumitra nalawade: