नागपूर : सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत दिल्ली येथे नव्या संसद भवनाचे बांधकाम होत आहे. या नव्या संसद भवन बांधकामाकरिता सुमारे ३०० घनमीटर सागवान लाकूड बल्लारशा आगारातून खरेदी करण्यात आले आहे. दोन दिवसांत २२ कोटींचे सागवान विक्री करण्यात आले आहे. २०२२-२०२३ मध्ये १६५ कोटींच्या सागवानाची या आगारातून विक्री झाली आहे.
वन विकास महामंडळाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा आगारात मोठ्या प्रमाणात सागवान येते. हे सागवान गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातून येते. विभागातून महाराष्ट्रात वन विकास महामंडळ हे शासनाचे अंगीकृत व्यवसाय केंद्र आहे. महामंडळात दर्जेदार सागवानाची निर्मिती करून त्याची विक्री केली जाते.
वनविकास महामंडळातील याच दर्जेदार सागवानाचा भारताच्या संसद भवनासाठी वापर होत असल्याने ही बाब महामंडळासाठी गौरवास्पद आहे. ७ जून २०२२ रोजी बल्लारशा विक्री आगारातून जाहीर लिलावात फायनल फिलिंग दर्जेदार सागाची विक्रमी विक्री करण्यात आली. येथून २०२२-२३ या वर्षात १६५ कोटी रुपयांच्या वनउपजाची विक्री झाली आहे. मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. ऑफलाइन लिलावात जवळपास १०० कोटी रुपयांचा महसूल महामंडळाला मिळाला आहे, अशी माहिती बल्लारपूर वनविकास महामंडळाचे सहायक वनसंरक्षक गणेश मोटकर यांनी सांगितले.
चंद्रपुरी सागवानाची खासियत
चंद्रपूरच्या सागवान लाकडाचा पॅटर्न अतिशय चांगला आहे. हा लाकूड टिकाऊ आहे. यासंदर्भात टेस्टिंग सर्टिफिकेट करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर या सागवान लाकडाच्या चाचण्या झाल्या. टिकाऊपणा, उपयुक्तता आणि अतिशय आकर्षक असा हा सागवान लाकूड आहे. यामुळे या लाकडाला पसंती देण्यात आली. इथं असलेलं लाकूड हे मुख्यत्वे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून आलेले आहे.
संसद भवनाच्या बांधकामाची शोभा वाढविण्यासाठी उत्कृष्ट लाकडाची आवश्यकता होती. त्यासाठी देशभरातील लाकडाची चाचपणी करण्यात आली. यात चंद्रपूर, गडचिरोलीचा लाकूड उत्कृष्ट असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे सेंट्रल विस्टाच्या उभारणीत राज्याचा मोलाचा वाटा राहणार असल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले असून या नव्या संसद भवनाकडे पाहताना मराठी माणसाचा अभिमानच वाटेल.