मुंबई : (Tejas Thackeray will join Shivsena) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षाच्या विरोधात बंदखोरी केली. त्यामुळे राज्यातील शिवसेना खिळखिळी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मात्र, शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेच्या निमित्ताने 40 बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदार संघात निष्ठा यात्रा काढत आहेत. यावेळी त्यांना राज्यातील जनतेचा मोठ्या प्रमाणावर उत्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कोणाचा होणार? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली होणार आहे तर शिंदे गटाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बीकेसी मैदानावर होणार आहे. दादरमधल्या शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार हे अद्याप ठरलेलं नसलं तरीही यादरम्यान, शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव ठाकरें चिरंजीव तेजस ठाकरेंचा फोटो दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणापासून लांब असलेले तेजस ठाकरे शिवसेना पडझडीनंतर पक्षाला सावरण्यासाठी मैदानात उतरतील असे अंदाज लावले जात होते. मात्र, आता शिनसेना दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर ‘ठाकरे’ कुटुंबातील हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याचे संकेत या पोस्टरमधून देण्यात आले आहेत.
शिवसेनेने आता दसरा मेळाव्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह यांच्यासह तेजस ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला आहे. तसंच या पोस्टरवर दसरा मेळाव्याचा पत्ता शिवाजी पार्क हाच देण्यात आला आहे. या पोस्टरमधून “आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ” असा संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे हा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असे संकेत यामधून देण्यात आले आहेत. यापूर्वीही दसरा मेळाव्याचे पोस्टर शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आले होते. जर शिवाजी पार्क मिळालं नाही, तर रस्त्यात उभं राहून भाषण करण्याची तयारीही उद्धव ठाकरेंनी दर्शवली आहे.