शिक्षकदिन विशेष |
शिक्षक ; परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक
शाळाबाह्य मुलांचा प्रश्न, मेळघाटात कुपोषित मुलांचा प्रश्न, आदिवासींचे शैक्षणिक प्रश्न हे आपले जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील काही प्रयोगशील शाळा आहेत, त्या अध्यापन पद्धती आणि उपक्रम स्वीकारून त्याचे सार्वत्रिकीकरण करायला पाहिजे. वर्गात रंजकता, कल्पकता आणून उद्याचा भावी नागरिक घडवण्याचे आव्हाने पेलू या.
आज ५ सप्टेंबर. शिक्षकदिन. हा दिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. देशातील अनेक शिक्षकांचा त्यांच्या उत्तम कार्याबद्दल सन्मान केला जातो. प्राचीन काळापासून आपल्या देशात गुरू-शिष्य परंपरा आहे. माणसाच्या जीवनात घर ही पहिली शाळा असते, तर शाळा हे दुसरे घर असते.
जीवनात शिक्षकाचे महत्त्व
शाळेच्या चार भिंतींत देशाचे भवितव्य घडत असते. शिक्षकांच्यामुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभियंते, लेखक घडत असतात. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. या नात्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा ‘शिक्षकदिन’ साजरा केला जातो. विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज आणि शिक्षणसंस्था अशी ही एक साखळी आहे. आज खडू-फळ्याऐवजी आपण मोबाईल, लॅपटॉप, संगणक याचा उपयोग करीत आहोत. आज भारत तरुणांचा देश आहे. पुढील २५ वर्षे देश समृद्ध करण्याचे काम ही आज विद्यापीठात शिकणारी तरुण पिढी करणार आहे. नवीन पिढीला चांगला माणूस बनवणारे शिक्षण कसे देता येईल, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो कसा वाढेल, या देशाबद्दल राष्ट्रप्रेम कसे निर्माण करता येईल याबद्दल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी मोलाचे विचार सांगितले आहेत, ते समजून घेणे गरजेचे आहे.
नवीन शैक्षणिक धोरण
डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने जो नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला, तो भारत सरकारने स्वीकारला आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ते परीक्षा पद्धतीपर्यंत अनेक गोष्टी आमूलाग्र बदलल्या आहेत. हे धोरण लोकशाहीचे मूलभूत ध्येय आहे. समता, बंधुता, एकात्मता या पायावर उभे आहे. सध्या शिक्षणात होणार्या बदलांचे प्रतिबिंब या नवीन धोरणात पाहायला मिळते. ते सर्वसमावेशक आहे. हे नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाला नव्या क्षितिजाच्या दिशेने नेईल याबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे. पूर्वी आपण ६ ते १४ वयापर्यंत शिक्षण सक्तीचे आहे, असा विचार करत असू. आता ते ३ ते १८ वयापर्यंत शिक्षणाचा विचार केला आहे. ५+३+३+४ असा नवा आकृतीबंध स्वीकारला आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चशिक्षणा बाबत सखोल विचार केला आहे. उच्चशिक्षणात मुक्त शिक्षणाची संकल्पना स्वागतार्ह आहे.
इयत्ता नववी ते बारावीला विज्ञान, कला, वाणिज्य असे कप्पे नसतील. विद्यार्थ्यांना कोणतेही विषय निवडता येतील. जीवनासाठी लागणारी जी महत्त्वाची कौशल्ये आहेत, संवाद कौशल्य, निर्णयक्षमता, सर्जनशील विचार, भावनांचे नियोजन, समस्या निराकरण या गोष्टी शिकवल्या जातील. अर्थसाक्षरता, उद्योजकता, व्यावसायिक शिक्षण विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचा मला आवडलेला बदल म्हणजे ‘स्वयंअध्ययन’. भारतात विद्यार्थ्यांना कसं शिकावं, हे सांगितलं जात नाही. या नवीन शैक्षणिक धोरणाचा हा महत्त्वाचा गाभा आहे. तुम्ही मूळ विषय शिकत असताना, संगीत, चित्रकला, शिल्पकला हे विषय घेऊ शकता, ही लवचिकता मोलाची आहे. शिक्षणाची दैनंदिन जीवनाशी सांगड, शोधकवृत्ती, चिकित्सकपणा, सौंदर्यदृष्टी, सर्जनशीलता यांवर भर असेल.
शिक्षक मित्रांनो, अभ्यासक्रम कितीही चांगला असला, नवीन तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी, शिक्षक हा या गोष्टी साकार करणारा असतो. तो परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक असतो.आपण सगळे जाणता की, सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. मुलांच्या मनात यश-अपयशा बरोबर, या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रचंड ताण आहे. हजारो रूपये खर्च करून शिक्षण घेतले तरी अपेक्षित यश मिळत नाही. ही भावना सार्वत्रिक आहे. महात्मा गांधी यांचा शैक्षणिक विचार महत्त्वाचा आहे, ‘करा आणि शिका’. हा मंत्र विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. मुलांनी अनुभवातून शिकण्यासाठी आपण आता वर्गात अशी रचना करू या. मुलं स्वत: प्रयोग करतील. आपण आता फक्त शिकायला मदत करायची आहे.
मुलं मुळातच कृतिशील असतात. सृजनशील असतात. मुलांना नितळ, निरागस, मोकळे, पारदर्शक वातावरण देऊ या. मुलांना चुका करण्यातून शिकायचं, अशी सवय लावू या. आपण त्यांना उत्तरे शिकवतो. त्यापेक्षा आत्मविश्वास देऊ या. मुलं अशी शिकताना पावले अडखळतील, आपण त्यांना सावरायला मदत करू या. मुलांकडून पाठांतर करून घेण्यापेक्षा विचार करायची सवय लावू या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भरपूर प्रश्न विचारावेत, शिक्षक आणि आपल्या बरोबर शिकणारे मित्र यांच्याशी चर्चा करावी. आकलनासाठी सराव आणि उपचारात्मक अध्यापनाची व्यवस्था करू या.
शिक्षक मित्रांनो, मनापासून केलेले अध्ययन हेच या नवीन शिक्षण व्यवस्थेचे मर्म आहे. शिकवणे महत्त्वाचे नाही. शिकणे महत्त्वाचे आहे. आता या जगाला विकास आवश्यक आहे, त्याबरोबर माणसाला मानसिक शांततेची गरज आहे. शिक्षणातून शांततेसाठी शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.