नेते भरपूर; पण चेहराच ठरेना!

पुण्यातील खासदारकीसाठी अनेक दिवसांपासून चाचपणी

पुणे | Pune News – पुण्यातील (Pune) दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातील नेत्यांचे लक्ष सध्या पुण्याकडे लागले आहे. पुणे लोकसभेसाठी अनेक दिवसांपासून भाजपची चाचपणी सुरू आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी प्रथम दैनिक ‘राष्ट्र संचार’ला मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर (Sunil Deodhar) यांच्या नावासाठी चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यानंतरही अनेक चेहऱ्यांची चर्चा झाली. आताही खासदारकीच्या उमेदवाराच्या नावांसाठी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपला सध्या ताकदवान चेहरा सापडेना, अशी परिस्थिती आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी भाजपला चाचपणीत यश येईना, असे दिसते.

पुणे लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची यावर भाजपमध्ये एकमत झालेले दिसत नाही. त्यातूनच माजी शहराध्यक्षांपासून ते थेट पंतप्रधानांंच्या नावांची पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून अनेक नेते, पदाधिकारी यांच्या नावांच्या चर्चा झाल्या. एवढेच नाहीतर पुणे लोकसभेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचीही चर्चा सध्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. मागील अनेक वर्षे पुणे भाजपवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता खासदारकीसाठी भाजप पक्षाकडे एक तरी चेहरा आहे की नाही, याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा सुरू होती. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या नाराजीचा फटका भाजपला बसल्याने पुणे लोकसभा निवडणुकीत असे प्रकार घडू नयेत यासाठी स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, असा दावा बापट कुटुंबीयांनी कधीच केला नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडू, असे बापट कुटुंबीय बोलत आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजप कोणता नेता निवडतात आणि भाजपचे वरिष्ठ काय निर्णय घेणार याकडे भाजपच्या गोटातील नेत्यांचे डोळे लागले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ नुकताच भाजपच्या हातातून सुटला आहे. त्यामुळे भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. विधानसभा गेली असली, तरी पुणे शहरातील लोकसभा मतदारसंघ आपल्या हातात मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची आतापासूनच धडपड सुरू आहे. त्यामुळे भाजप कोणता डावपेच तयार करणार, याकडे विरोधकांचे मात्र लक्ष आहे.

आतापर्यंत या नावांची चर्चा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, आता तर खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याही नावाची चर्चा आहे.

admin: