वाजत गाजत, गुलाल उधळत या! ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज; पाहा व्हिडिओ

ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दसऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दसरा मेळाव्याचा टीझर पोस्ट करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पोस्ट केलेल्या टीझरच्या सुरुवातीला फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा आवाज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पाठमोरा उभा असलेला फोटो पाहायला मिळतो. यामध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, “जर विरोधकांना वाटत असेल की शिवसेना संपली, त्यांना मला दाखवायचे आहे शिवसेना काय करुन दाखवते.”

या टीझरबरोबर लिहिले की, “दादरमधील शिवाजी पार्क मैदानाच्या शिवतीर्थावर 12 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सर्वांनी वाजत गाजत आणि गुलाल उधळत यावे.” सध्या हे टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटात पडलेल्या फुटीनंतर दोन गट निर्माण झाले. शिवसेना फुटल्यानंतर मुंबईत दोन्ही शिवसेनेचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागले आहे. शिवसेना फुटल्याच्या पहिल्या वर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष झाला होता.

यंदा मुंबई महापालिकेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे  दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे

Rashtra Sanchar: