ठाणे : (Thane Shiv Sena News appointed leaders) शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी अभूतपूर्व बंड केल्यानंतर पक्षाला पुन्हा उभारण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे, पालघर जिल्हात पक्ष उभारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळातील शिवसैनिकांवर जबाबदारी दिली आहे. उदय बंधू पाटील यांची उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांचे विरोधक समजले जाणारे माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांची पालघर, भिवंडी आणि ठाणे लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्हा प्रमुख असताना त्यांचा पालघर जिल्ह्यातील भागांवर प्रभाव होता. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जुने शिवसैनिक सक्रिय झाले आहेत. ठाण्यातही आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे हे सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.
तर, दुसरीकडं आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे देखील सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले होते. त्यामुळे केदार दिघे हे काही काळ पक्ष कार्यापासून दूर होते, अशी चर्चा सुरू होती. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले देखील पुन्हा शिवसेनेत सक्रिय होत आहेत. शिवसेना नेतृत्वाकडून या जुन्हा शिवसैनिकांना संधी दिली जात आहे.