तृतीयपंथी संघटनांकडून महापालिका प्रशासनाचे आभार

पिंपरी : समाजातील दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी घटकाला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतलेले निर्णय परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी आहेत. महापालिकेचे हे काम कौतुकास्पद असून आम्हाला माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार्‍या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आम्ही मनापासून अभिनंदन करीत आहोत, अशा शब्दांत तृतीयपंथी प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच विविध योजनांना मंजुरी देऊन त्या योजना जाहीर केल्या. शिवाय तृतीयपंथी घटकांना ग्रीन मार्शल पथकामध्ये नेमणूक देण्याचा, वायसीएम रुग्णालयात या घटकांसाठी स्वतंत्र बेड आरक्षित ठेवण्याचा, महापालिकांच्या काही उद्यानांच्या देखभालीचे काम देण्याचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना, त्यांच्या बचत गटांना अर्थसहाय्य अशा नावीन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज तृतीयपंथीय प्रतिनिधींनी आयुक्त राजेश पाटील यांचे पुष्पगुच्छ, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत आणि शाल देऊन अभिनंदन केले. त्यावेळी या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महापालिकेने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलून उपेक्षित घटकांना समतेची वागणूक आणि त्यांचे न्याय हक्क अधिकार देण्याचे स्तुत्य काम केले आहे, असेही या प्रतिनिधींनी सांगितले. रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था, रयत विद्यार्थी विचार मंच आदी संघटनांनी आयुक्त राजेश पाटील यांची महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले. यामध्ये तृतीयपंथी संघटनेच्या आशा देसले, रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे, खजिनदार नीलेश पवार, तृतीयपंथी सदस्य सिद्धी कुंभार, रोहिणी परमार, अनुष्का मंजाळ, अनु जगताप, शनया यांचा समावेश होता. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी
किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

Nilam: