पुणे : पुण्यातील ४३ वर्षीय वडील आणि त्यांचा मुलगा यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या (SSC) दहावीच्या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत वडील ४३ टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. पण मुलगा यशस्वी होऊ शकला नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
भास्कर वाघमारे हे टेम्पोचालक आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी १९९३ साली सातवीमध्ये शाळा सोडली आणि त्यांना नोकरी करावी लागली, परंतु पुढे त्यांची शिकण्याची इच्छा कायम राहिली. तब्बल ३० वर्षांनंतर या वर्षी त्यांनी मुलासोबत परीक्षा दिली. पुणे शहरातील बाबासाहेब आंबेडकर परिसरात राहणारे वाघमारे हे खासगी क्षेत्रात काम करतात. त्यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मला नेहमीच अधिक अभ्यास करायचा होता, परंतु कौटुंबिक जबाबदार्यांमुळे ते करू शकलो नाही. वाघमारे म्हणाले की, काही काळापासून मी माझा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी आणि काही कोर्स करण्यासाठी उत्सुक होतो. ज्यामुळे माझ्या नोकरीत आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. म्हणून मी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. माझा मुलगाही या वर्षी परीक्षेला बसला होता आणि त्याचा मला फायदा झाला.