अन्यथा ‘पैशा’वर पडणार पावसाचे ‘पाणी’; ५ जूनचा दावा खोेटा ठरल्यास लाखोंचे नुकसान

पुणे : पावसाळ्यात शहरात नाल्यांमध्ये पाणी तुंबू नये, रस्त्यावरचे पाणी लगेच वाहून जावे, यासाठी महापालिकेने नालेसफाई आणि पावसाळी गटारांची सफाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत नाल्यांची आणि पावसाळी गटारांची काही प्रमाणात स्वच्छता झाली आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व नालेसफाईला सुरवात केली आहे.

प्रशासनाकडून ५ जूनपर्यंत शहरातील सर्व कामे पुर्णत्वास जाईल असा दावा करण्यात आला आहे. परंतु असे नाही झाले तर लाखोंचे नुकसान होणार हे मात्र खरे. मात्र, ज्या गतीने आज कामे सुरू आहेत, ते पाहता पावसाळ्या अगोदर ही सफाई पूर्ण होईल असे वाटत नाही. त्यामुळे पुन्हा पुणेकरांना ऐन पावसाळ्यात धावपळ होण्याची शक्यता आता वर्तवित येत आहे.

काही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्‍या ओढे व नाल्यांची सफाई जवळपास ८० टक्के पूर्ण झाली असून, दहा ते बारा दिवसांत राहिलेले २० टक्के काम मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यापूर्वी राडारोडा उचलण्यासहित पूर्ण केले जाईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. हे जरी खरे असले, तरी खर्‍या अर्थाने नालेसफाई झाली का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. अन्यथा कोट्यवधी रुपयांच्या पैशांवर पावसाचे पाणी पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरेल अशी कोणतीही कृती केल्यास आपत्ती उद्भवू शकते. त्यामुळे नदी नाल्यांचे व्यवस्थित संरक्षण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवला पाहिजे, पावसाळ्यात बर्‍याच ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडतात. तेंव्हा नागरिक महापालिकेला दोष देतात. त्यामुळे वेळोवेळी या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. स्टॉर्म वॉटर वाहिन्यांचे चोकअप काढले पाहिजे, पाणी वाहून जाण्याची छिद्रे अथवा पाईप काही कारणास्तव बुजले गेल्यास तेथे पाणी तुंबते. त्यामुळे सातत्याने पाहणी करून कोठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. शिवाय वेळोवेळी नालेसफाई होणे आवश्यक आहे. प्रत्येक नाल्यासंदर्भात वेगळ्या समस्या असतात, त्यांचा अभ्यास करून सफाईच्या कामाचे योग्य नियोजन केले पाहिजे.
_राजेश पाटील, आयुक्त (पिंपरी चिंचवड)

आसपासच्या परिसरात पावसाळापूर्व कामाला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र नाले ओढ्यांची संख्या लांबी-रुंदी पाहता पावसाळ्याअगोदर ही कामे मार्गी लागतील, असे वाटत नाही. कोंढवा-वानवडी परिसरात लहान-मोठे नाले, ओढे आहेतच. याशिवाय पावसाळ्यात धोकादायक ठरणारे नालेसाफसफाई होणे खूप महत्त्वाचे आहे. ओढ्यातील असणारे अडथळे व योग्य नालेसफाई झालेली नसल्याचे नागरिकांतून चर्चीले जावू लागले आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एक नाले सफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छतेची काम सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठते तर काही ठिकाणे धोकादायकही आहेत. त्यावर महापालिका काम करत आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले स्वच्छ होतील, सध्या ९० टक्के कामे पुर्ण झाली आहेत. ५ जूनपर्यंत बाकीचे सर्व कामे पूर्ण होतील.
_डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त

पुण्यात दरवर्षी ३० मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात होते. हा पाऊस चांगला पडत असल्याने नाल्यातील गाळ, कचरा वाहून जातो हे वर्षानुवर्षाचे चित्र आहे. असे असतानाही पालिकेने नालेसफाईच्या कामांसाठी १५ जूनची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाला, की पावसाचे पाणी आपले काम करून जाते. अर्धवट कामांमुळे नाल्यांना पूर आलाच, तर आम्ही काम केले होते पाऊसच जास्त होतो’ असे सांगत वेळ मारून नेली जाते.

यंदाही अधिक पावसाचा अंदाज असताना, शहरातील पूरस्थिती रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले का? असा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे पुणेकरांना यंदाही पुराचा फटका सहन करावा लागणार की काय? या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. महापालिकेवर आता प्रशासक नियुक्त झाल्यानंतर पावसाळापूर्वीच्या कामांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाळा अवघा दोन-तीन दिवसांवर आलेला असतानाच रखडलेली नालेसफाई, रस्त्यांची चुकीच्या पद्धतीने झालेली कामे पाहता, अपेक्षाभंग झाला आहे का? असा प्रश्न शहरवासियांमधून होत आहे.

शहरात यापूर्वी केवळ मुठा नदीलाच पूर येत होता. तो ठराविक भागांपुरताच मर्यादित होता. तर शहर टेकड्यांमध्ये वसलेले असल्याने उतारावर आलेले पाणी वाहून नेणारे नाले मोठे होते. मात्र, नागरिकरण वाढत गेले, तसे नाले-वाहिन्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकल्या. नाल्याकडेला भराव टाकून जागा गिळंकृत करण्यात आल्या. काही भागात पाईपलाइन टाकून नाले बुजविण्यात आले. तर काही ठिकाणी ते अक्षरश: अनैसर्गिक पद्धतीने वळविण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढत आहे, तसतशी नाल्यांची वहन क्षमता कमी होत आहे. त्याचे परिणाम शहरावर होत असून, नदीला पूर न येताही शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी शिरत आहे.

अतिक्रमणे, गाळ आणि कचर्‍यामुळे कमी झालेली वहन क्षमता पाहता, पूरस्थिती उद्भवणार हे निश्चित असताना प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिने आधीच हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. पण, यंदाही हे काम पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी सुरू आहे. शहरात समोर दिसतील असेच नाले स्वच्छ करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील सफाईच्या कामासाठी पालिकेच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. या कामासाठी आवश्यक जेसीबी, पोकलेन, डंपर आदी मशिनरी संबंधित विभागाने वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन नालेसफाईच्या कामकाजाचा आढावा घेतला. झालेल्या बैठकीत नालेसफाईचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी क्षेत्रीय अधिकार्‍यांनी दिली.

Dnyaneshwar: