खासगी क्लासेसचे प्रस्थ चिंताजनक

मग शाळा, कॉलेजमध्ये काय शिकवतात ?

दि. ७ नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. कारण या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंग हायस्कूल, सातारा येथे शाळाप्रवेश झाला होता. हा दिवस विद्यार्थी दिवस म्‍हणून पाळण्यात येतो. मात्र, हल्ली केजीपासून पीजीपर्यंत, खेड्यांपासून शहरांपर्यंत खासगी शिकवणीचे प्रस्थ वाढतच चालले आहे. विद्यार्थी या खासगी क्लासशिवाय घडणारच नाहीत का ?

हल्ली शाळा, महाविद्यालयांपेक्षा खासगी शिकवण्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. गत काही वर्षांत शिकवणी वर्गांची आता संस्थाने झाली आहेत. चांगल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला तरी शिकवणी लागतेच, असा समज पालकांचाही झाला आहे. त्यामुळे शिकवणीला जात नाही, असा विद्यार्थी सापडणे अवघड आहे. काही शिकवणी वर्गांचा तर खूप बोलबाला झाला आहे. अमूक एक विद्यार्थी त्या क्लासला जातो, म्हणून आपलाही मुलगा तेथेच गेला पाहिजे, असा पालकांचा आग्रह असतो. त्यामुळे घरात ओढाताण आणि गैरसोय सहन करून त्याच खासगी वर्गात प्रवेश घेतला जातो. कोचिंग क्लासेसवाले मात्र यशस्वी विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचे भांडवल करत असतात. विद्यार्थ्यांना आपल्या क्लासकडे कसे वळविता येईल, याचे गणित खासगी क्लासचालक आखत असतात. तथाकथित नावाजलेल्या क्लासमध्ये पाल्याचा प्रवेश घेणे हे अनेक पालकांचे स्वप्न असते. अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे आपल्या पाल्याचे करिअरच घडले, अशीच अनेक पालकांची धारणा असते.

त्यामुळेच कॉलेजपेक्षाही क्लासेसची किंमत वाढली असून, कॉलेजचे पिरियड्स नाममात्र राहिले आहेत. आणि सर्वच जर खासगी क्लासेसमध्ये शिकवून मिळत असेल तर मग शाळा, महाविद्यालय करतं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होतो. शिक्षणाचे बाजारीकरण झपाट्याने होत आहे. दहावी, बारावीचे निकाल लागले की, शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशाबरोबरच क्लासेसच्या प्रवेशांची देखील धांदल उडते. या वाढत्या फॅडमुळे कोचिंग क्लासला विद्यार्थी मावेनात आणि कॉलेजचे वर्ग रिकामे, अशी स्थिती झाली आहे. विद्यार्थी शाळेला, महाविद्यालयाला दांडी मारून शिकवणी वर्गात बसणे पसंत करत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सुज्ञ पालकांनीच पुढे येण्याची गरज आहे. शिकवणी वर्गांना पर्याय नाही, असा सर्वांचा समज असल्यामुळे क्लासचालक म्हणतील तसे, असेच वातावरण सध्या निर्माण झाले आहे. खासगी शिकवणीचे वर्ग सुरू करण्यासाठी काही नियम नाहीत का? त्यांना त्यासाठी कोणाच्या परवानग्या घ्याव्या लागत नाहीत का? सरकारचे अशा कोचिंग क्लासेसवर कोणतेही नियंत्रण नाही का? अशा क्लासेसचे कोणी परीक्षण व पाहणी करीत नाही का, असे प्रश्‍न उपस्थित राहतात.

काही मोजक्‍या शिकवणी वर्गांनी आपला नावलौकिक अद्याप टिकवून ठेवला असला, तरी बहुतांश शिकवणी वर्गांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. शाळांना शुल्क किती असावे, एका वर्गात एका बॅचला किती विद्यार्थी असावेत, तेथे काय काय सुविधा असाव्यात, याबद्दल नियम आहेत. परंतु, खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्यांना असे काहीच ठोस नियम नाहीत का. असेल तर त्‍याचे पालन होते का, हे सर्वच क्लासेसला सरसकट लागू होत नाही. त्याला काही क्लासचालक अपवादही असतील. मात्र, किती क्लासचालक नियमांचे पालन करतात. भरमसाठ शुल्क आकारून चालणाऱ्या या शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांचाही विचार होत नाही. या शिकवणी वर्गांना विद्यार्थी संख्येचे बंधन नाही. त्यामुळे एकेका बॅचला कितीही विद्यार्थी घेतले जातात. अपुऱ्या जागेत त्यांना बसविले जाते. काही मोजके अपवाद वगळता ज्या कोणाच्या नावाने शिकवणी वर्ग चालतो, ते प्रत्यक्षात शिकवण्याचे काम करीत नाहीत. शिकवणी वर्गाचे नियम त्यांचे त्यांनीच ठरविलेले असतात. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत बॅचेस सुरू असतात.

सुट्यांचे नियोजन ऐनवेळी केले जाते. त्यामुळे केव्हाही अचानक सुटी दिली जाते. वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्यावरच वाहने लावली जातात. शॉपअ‍ॅक्टच्या परवाना आवश्यक असताना अनेकांकडे तो देखील नसतो. खास करून गल्लीबोळातील क्लासचालकांकडे तर कोणताच व्यायसायिक परवाना शक्यतो दिसून येत नाही. केवळ ज्याला वाटेल तो बोर्ड लावून आपला खासगी क्लास सुरू करतो. काहींचे तर तसे फलक सुद्धा नाही. फक्त माऊथ पब्लिसिटी करून क्लासच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाते. यावर नियंत्रण नसल्यामुळे खासगी क्लासेसचे पेव फुटले आहे. सध्या गल्ली-गल्लीत कोचिंग क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे आता खासगी शिकवणी वर्गांसाठी नियमांचे पालन करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यासाठी संबंधित सरकारी यंत्रणाबरोबर पालकही आग्रही असायला हवेत. पालकांना क्लासची व कॉलेजची फी असा दुहेरी बोजा सोसावा लागतो. कित्येक शिकवणी वर्ग निवासी जागेत सुरू आहेत. एका क्‍लासमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थी असतात. याचा विचार केल्यास खासगी क्‍लासेसचे कोट्यवधी रुपयांचे मार्केट असते. काही क्लासचालक मात्र घरपट्टी व पाणीपट्टी निवासी म्हणजे अल्पदराने भरून त्याद्वारे कर चुकवतात व शासनाची फसवणूक केली जाते. त्यातून शासनाला वर्षाकाठी कररूपी लाखो रुपयांचा चुना लागतो.

-संजय सपकाळे

Nilam: