The Bageshwar Sarkar : मध्यप्रदेशातील ‘बागेश्वर धाम’ (Bageshwar Dham) हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या भाविकांचे मन वाचता येत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामची चमत्कारिक शक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘द बागेश्वर सरकार’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितलं की, बागेश्वर बाबा यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवण्यासाठी स्वतः बागेश्वर बाबांनी आशीर्वाद दिला आहेत. बागेश्वर सरकार यांच्याशी सल्लामसलत करूनच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. ही स्क्रिप्ट आता 90 टक्क्यांपर्यंत लिहिली गेली आहे. या चित्रपटाचे शूटिंग छतरपूर, भोपाळ, मध्य प्रदेश आणि देशाच्या विविध भागात होणार आहे. तसेच या चित्रपटाचा काही भाग लंडनमध्येही शूट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चित्रपटातील बाबा बागेश्वर सरकार आणि इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची माहिती नंतर जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
चित्रपटाचे शूटिंग कधी सुरु होणार?
”द बागेश्वर सरकार’या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार असून पुढील वर्षी हिंदी, इंग्रजी आणि भारतातील इतर अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मी बागेश्वर बाबा यांचा शिष्य असल्याने कोरोनाच्या काळात मी बाबांसमोर चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता,गेल्या वर्षभरापासून चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.’, अशी माहिती विनोद तिवारी यांनी मुलाखतीमध्ये दिली. या चित्रपटात बाबा बागेश्वर यांच्या बालपणातील संघर्षापासून ते जगभरात लोकप्रिय होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार असल्याचे विनोद तिवारी यांनी सांगितले.
बागेश्वर बाबांबद्दलचे वाद, त्यांच्यावर ढोंगी असल्याचा आरोप, हे सर्व या चित्रपटात काही दाखवले जाईल का? असा प्रश्न विनोद यांना विचारण्याच आला. या प्रश्नाचं उत्तर देत विनोद तिवारी म्हणाले की, ‘सध्या या चित्रपटाविषयी फार काही खुलासा करू शकत नाही. त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.’ विनोद तिवारी हे द कन्व्हर्जन, तबादला यांसारख्या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत. आता त्यांचा ‘द बागेश्वर सरकार’हा चित्रपट रिलीज होणार आहे.