लढाई आधीच भाजपाच्या अंतर्गत लाथाळ्या

पदाधिकाऱ्यांनीच झुगारला अंतर्गत मतदानाचा फॉर्म्युला

लढाई आधीच भाजपाच्या अंतर्गत लाथाळ्या

सर्व संमतीचा उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरावा यासाठी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत मतदान करून उमेदवार निवडण्याच्या भाजपाच्या फॉर्म्युल्याला त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः जुगारल्याचे स्पष्ट आहे. ज्येष्ठ आमदार असलेल्या माधुरी मिसाळ भीमराव तापकीर यांच्या सारख्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रकाराला सपशेल अपयशी ठरविले आहे. त्यामुळे अध्यक्ष ओरिएंटेड म्हणणारा भाजपा प्रत्यक्षात आमदार ओरिएंटेड होत असल्याचे दिसत आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांमधून म्हणजेच प्रत्यक्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांमधून आमदारकीचा उमेदवार ठरवावा या उदात्त हेतूने पदाधिकाऱ्यांचे मतदान घेण्याचा फार्मूला निश्चित केला. यातून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पसंती क्रमाने तीन जणांची नावे द्यायची होती. परंतु बहुतांशी पदाधिकारी हे आमदार ओरिएंटेड आहेत. आमदारांच्या शिफारशीनुसारच ह्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे पक्षापेक्षा बरेचसे पदाधिकारी आणि जेष्ठ कार्यकर्ते हे आमदार समर्थक असल्याचे दिसते. पक्षापेक्षा देखील ‘आमचा नेता’ या ओरिएंटेशन ने हे कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी पसंती क्रम देताना आपल्या नेत्याचे म्हणजे त्या आमदाराचे नाव लिहिले. अनेकांनी दोनच नावे लिहिली.

ज्या मतपत्रिकेमध्ये तीन नावे नसतील ती मतपत्रिका बाद ठरविण्याचे सांगण्यात येत होते. तथापि एक किंवा दोनच नावे लिहिल्यामुळे अनेक मतपत्रिका बाद ठरल्याशिवाय जेष्ठ पदाधिकारी कोणाला म्हणायचे यावरून देखील आमदारांमध्ये जुंपली आहे . या एकूणच प्रकारामुळे धनंजय महाडिक हे हैराण झाले आहे.

पर्वती मतदारसंघात भिमाले यांनी ताकद लावली आहे. परंतु ते दरवर्षीच इच्छुक असल्याचे सांगतात आणि नंतर तडजोडीतून माघारी घेतात. ही चर्चा भाजपाच्या कार्यकर्त्यातच आहे,  त्यामुळे तेथे माधुरी मिसाळ यात प्रबळ दावेदार ठरतात. भिमाले हे विधानसभेसाठी लढतात परंतु त्यांची प्रत्यक्षात तयारी महापालिकेसाठी सुरू असते, असेही चर्चिले जाते. भिमाले हे येथे सक्षम उमेदवार नाहीत. त्यामुळे मिसाळ यांना फारशी स्पर्धा दिसून येत नाही. परंतु तापकीर यांच्याबाबत चित्र वेगळे आहे. तेथे आता राष्ट्रवादीचा प्रभाव वाढल्यामुळे तापकीर हे यंदा निवडून येणार नाहीत याबाबत अनेक पदाधिकारी ठाम आहेत. परंतु प्रत्यक्षात बैठकीत तापकीर यांनी कुणालाही बोलू न देता सगळ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.

  • पुणे शहर मधील सर्वच मतदारसंघात चंद्रकांत पाटील सोडले तर कुठल्याही आमदाराच्या नावावरती शिक्कामोर्तब नाही. कोथरूडमध्ये देखील अमोल बालवडकर, उज्वल केसकर यांनी दावेदारी केली आहे. परंतु या दोघांची नावे फारशा पदाधिकाऱ्यांनी लिहिलीच नसल्याचे समोर येते. खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर हे तीन वेळा निवडणूक लढवलेले आहेत. शिवाय माधुरी मिसाळ यांना देखील अनेक टर्म झाले आहेत. या दोघांच्या विरोधामध्ये मतदारसंघात सुप्त लाट असल्याचे सांगितले जाते परंतु हे दोघेही आता ऐकायला तयार नाहीत.
Rashtra Sanchar: