पुणे – Pune News | सैनिक देशाचे आणि देशांच्या सीमांचे रक्षण करतात, त्यांचे कार्य अतुलनीय आहे. मात्र, कोणता देश बलशाली आहे, हे केवळ सैनिकांच्या शक्तीवर नाही, तर त्या देशातील संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरते. गुणवत्ता असलेल्या नागरिकांची संख्या ज्या देशात असते, तो देश खर्या अर्थाने शक्तिशाली असतो. भारतात संस्कार वर्गांच्या माध्यमातून संस्कारित नागरिक घडविण्याचे काम उत्तमपणे सुरू असल्याचे मत रा.स्व. संघाच्या कसबा भागाचे संघप्रमुख अॅड. प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
आजकाल मोबाइल, टीव्हीशिवाय लहान मुले जेवणदेखील करीत नाहीत. तेव्हा अशा संस्कार केंद्राचे महत्त्व व जबाबदारी वाढत आहे. सर्वत्र सोशल मीडियाचा दुष्परिणाम वाढत असून, लहान मुलांना चांगले नागरिक बनविणार्या संस्कार केंद्रांमध्ये वाढ व्हायला हवी.
_स्वरदा बापट, भाजप, पुणे शहर उपाध्यक्ष
श्रुतीसागर आश्रम फुलगाव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त कसबा पेठेतील श्री नामदेव शिंपी दैव मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट, माजी नगरसेवक योगेश समेळ, कल्पना जाधव, अॅड.प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, डॉ.मिलिंद भोई, कुमार रेणुसे, राजू परदेशी, अरविंद कोठारी, केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठचे अध्यक्ष पीयूष शाह, कसबा गौरव पुरस्कार अष्टपैलू कलाकार वैष्णवी पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू सार्थक चव्हाण यांना आणि बालगौरव पुरस्कार सिने नाट्य बालअभिनेता शर्व दाते यांना प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प.पू.स्वामी स्वरुपानंद सरस्वती (फुलगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.