“इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिलं आहे त्यामुळे…”, वीरेंद्र सेहवागची मोठी मागणी

मुंबई | Virender Sehwag – नुकतीच वनडे वर्ल्डकप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अशातच आता देशाच्या नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. देशाचं नाव भारत (Bharat) असावं की इंडिया (India) याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भात काही वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. तर आता पुन्हा एकदा देशाच्या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) आपलं मत मांडलं आहे.

वीरेंद्र सेहवागनं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांना टॅग करून त्यांना एक विनंती केली आहे. त्यानं ट्विट करत म्हटलं आहे की, “नेदरलँड संघ 1996 मध्ये हॉलंड या नावानं वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात आला होता. पण 2003 मध्ये आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा त्यांचं नाव नेदरलँड झालं होतं. आताही तेच नाव लागू आहे. ब्रिटीशांनी बर्मा हे नाव दिलं होतं पण आता त्याचं नाव म्यानमार आहे. अशीच आता बरीच खरीखुरी नावं समोर येत आहेत.”

“तुमच्या सर्वांचा ऊर अभिमानानं भरून येईल अशाच नावाचं मी समर्थन करेनं. आपण सगळे भारतीय आहोत. ब्रिटीशांनी इंडिया हे नाव दिलं आहे. त्यामुळे आता भारत हे नाव लागू केलं पाहीजे. मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की आपल्या जर्सीवर भारत हे नाव असावं”, अशी मागणी वीरेंद्र सेहवागनं केली आहे. तसंच त्यानं बीसीसीआयच्या ट्विटवर चूक दुरूस्त करण्याची विनंती केली आहे. ट्विटमध्ये टीम इंडिया नाही तर टीम भारत लिहिण्याची विनंती सेहवागनं केली आहे.

admin: