भाजपचा ’कंदील’ मोर्चा
पिंपरी : आघाडी सरकारचे करायचं काय, खाली डोके वर पाय… उषःकाल होता होता, काळ रात्र आली… ही काळरात्र महाआघाडी सरकारने आणली… अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे पिंपरी येथे कंदील मोर्चा काढण्यात आला. राज्यभरात भारनियमनाच्या तडाख्यात नागरिक तावून-सुलाखून निघत आहेत. या भारनियमनामुळे उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. याला सर्वस्वी महाआघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रात लोडशेडिंग अर्थात भारनियमन लावल्याच्या निषेधार्थ पिंपरी, मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे रविवारी सायंकाळी महावितरणच्या विरोधात कंदील मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, अर्जुन ठाकरे, अनुराधा गोरखे, तसेच अजय पाताडे, सुप्रिया चांदगुडे, वैशाली खाड्ये, रवि जांभूळकर, दिनेश यादव, आशा काळे, वीणा सोनवलकर, सुभाष सरोदे, सतपाल गोयल, विजय शिनकर, गणेश ढाकणे, प्रदीप बेंद्रे, देवदास शिंदे, महादेव कवीतके, कैलास सानप, दीपक नागरगोजे, संकेत चोंधे, शिवदास हांडे, देवदत्त लांडे, संतोष ठाकूर, दत्ता यादव, अमित गुप्ता, मनोज तोरडमल, महेंद्र बाविस्कर, महेंद्र ढवाण, कविता हिंगे, दीपाली कारंजकर, हेमंत देवकुळे, सोनाली शिंपी, बालाजी रंगनाथन, सचिन उदागे, विक्रांत गंगावणे, सोनम जांभूळकर, पोपट हजारे, सचिन डोंगरे, नंदू भोगले, अतुल इनामदार, किरण पाटील, राजू बाबर आदी उपस्थित होते.
महेश लांडगे यावेळी म्हणाले, सातत्याने गेल्या दोन वर्षांपासून अघोषित भारनियमनाचा त्रास सुरूच आहे. मात्र या उन्हाळ्याच्या तडाख्यात भारनियमन अधिकच गडद झाले आहे. कोणतीही सूचना न देता वीज आठ ते दहा तास औद्योगिक पट्ट्यामध्ये गायब असते. अशावेळी उद्योजकांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे उद्योजकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर उद्योजक आधीच खचलेले असताना त्यात आता लोडशेडिंगचे दुखणे त्यांच्यामागे सुरू झाले आहे. यातून उभारी कशी घ्यावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
कारखानदारी चालणार कशी?
– पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्टा आहे. तब्बल पंचवीस हजार छोटे-मोठे उद्योग व्यवसाय या भागांमध्ये आहेत. या भागांमध्ये अघोषित भारनियमनाचा त्रास यापूर्वीदेखील सुरू होता. शिवाय आता सरकारने भारनियमन लादून दुहेरी संकट उद्योजक, व्यापारी यांच्यावर लादले आहे. गेली दोन वर्षे महामारी, लॉकडाऊन अशा सर्व संकटांमध्ये गेली आहेत. आता कुठे उद्योग, व्यवसाय उभारी घेत असताना पुन्हा भारनियमनाचे संकट ओढवले. यातून आता कारखानदारीत चालणार कशी, असा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. याचा दूरगामी परिणाम येथील नागरिकांवरदेखील होणार आहे, असे मुद्देदेखील या कंदील मोर्चात उपस्थित करण्यात आले.