हे ‘ग्रहण’ का टाकलेला ‘खोडा’?

राजकारणातील गुपिते आणि आराखडे हे लागलीच बाहेर येत नसतात. त्याला काही अवधी जावा लागतो. पण आपल्या बहुजनांना दिशा देणारी ‘स्वराज्य’ नावाची संघटना काढून राजेंनी जे धाडस दाखवले आहे ते त्यांच्या चाणक्यनीतीचा एक भाग असू शकतो. येणार्‍या राजकीय परिस्थितीत बहुजन समाजाचा मुख्य आधार असलेल्या राष्ट्रवादी पक्षावर याचा काय परिणाम होतो, हे पाहिले पाहिजे.

राजकारण गतिमान असते, राजकारण परिवर्तनशील असते, तेच राजकारण परिणामकारकही असू शकते. आर्य चाणक्य यांनी राजकीय सूत्रांचे चाणक्यनीती ग्रंथात वर्णन करताना काही महत्त्वाची सूत्रे सांगितलेली आहेत. या सूत्रांचा वापर करूनच त्यांनी जुलमी राजाला सत्तेच्या बाहेर घालवून चंद्रगुप्त मौर्याला सत्तेचा सम्राट केला. ही सूत्रे आजही काही प्रमाणात देशाच्या राजकीय परिस्थितीत क्रांतिकारक बदल घडवू शकतात किंवा राजकीय परिस्थितीवर परिणाम घडवू शकतात. अगदी काल-परवा सिलोनमध्ये जे घडले, त्याची कारणमीमांसा जर आपण पाहिली तर आर्थिक दौर्बल्य हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे.

नुकत्याच राजीनामा दिलेल्या पंतप्रधानाला आपल्या देशाची आर्थिक घडी का बसवता आली नाही? याची अनेक कारणे असू शकतात, परंतु राजकारणात जी सावधानता हवी असते, अचूक निर्णय घेण्याची काही विशिष्ट संधी असते आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रयतेच्या मनातील घालमेल ओळखता आली पाहिजे. ही सगळी कारणं तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी वेळीच ओळखली नाहीत. परिणामस्वरूप त्यांना आणि कुटुंबीयांना एका लष्करी तळावर आश्रयाला जावे लागले. असे गंभीर प्रश्न केव्हा केव्हा राजकारणात निर्माण होतात. महाराष्ट्राच्या राजकारणात आजच अशी गंभीर परिस्थिती काही खास पक्षांसाठी निर्माण झालेली आहे.

आज दुपारी १२ वाजता पुणे येथे एक पत्रकार परिषद घेऊन छत्रपती शाहूमहाराजांचे वंशज माजी खा. छत्रपती संभाजीराजे यांनी आपली भावी राजकीय वाटचाल काय असेल, याचे सखोल विवेचन केले. संभाजीराजे छत्रपती शाहूमहाराजांचे वंशज. छत्रपती शाहूमहाराजांनी दलित, पददलित इतकेच नव्हे, तर मध्यमवर्गीयसुद्धा रयतेला न्याय देऊन सामाजिक भान ठेवलेच ठेवले; परंतु कृषी समृद्धीसाठी काही धरणे उभा केली. रयतेला जगण्याची साधने निर्माण करून दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाती-पातीचा विचार गाडून टाकला. शाहूमहाराज रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे ठरले. शाहू-फुले-आंबेडकर यांचा मार्ग देशातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी याच मार्गाने चाललेलो आहोत, अशी आजपर्यंत ग्वाही देत आला.

हे वर्म मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पूर्णपणे जाणल्याने २०१६ मध्ये छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेचे सभासद होण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्यही केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट करून सांगताना या खासदारकीच्या अधिकाराचा मी वापर करून संपूर्ण देश हिंडलो. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजकीय-सामाजिक विचारांचा प्रसार केला. मा. राष्ट्रपतीजींना रायगडच्या किल्ल्यावर आणले. लोकसभेत कमी बोललो, पण छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचे सतत प्रसारीकरण करत राहिलो. लोकांमध्ये हिंडलो, फिरलो, त्यामुळे सर्वसामान्य गरीब आणि बहुजन समाजातील परिस्थितीकडे माझे लक्ष गेले. समाजातील गरिबांवर होणारे अन्याय जवळून पाहिले.

त्यांच्या सुख-दु:खाशी मी समरस झालो आणि जाणीव झाली, छत्रपती घराण्यावर प्रेम करणारा हा बहुजन समाज किती मोठ्या प्रमाणात आहे. यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. या स्पष्टीकरणानंतर महाराजांनी दोन निर्णय जाहीर केले. पहिला निर्णय होता, अपक्ष खासदार म्हणून येणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा आणि दुसरी घोषणा केली ‘स्वराज्य नावाची एक राजकीय संघटना स्थापन करायची.’ छत्रपतींच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणावर हिमालयातील बर्फाचा प्रचंड कडा कोसळला आहे किंवा आकाशातून एखादा तप्त गोल सह्याद्रीच्या कड्यावर पडलेला आहे आणि त्याचा परिणाम चांद्यापासून बांद्यापर्यंत, तसेच ब्रह्मगिरीच्या गोदावरीपासून ते कृष्णा-कोयनेच्या पात्रापर्यंत पसरलेल्या जलाशयावर झालेला आहे, अशी वातावरणनिर्मिती होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज केंद्रबिंदू जर असेल तर तो महान मुत्सद्दी राजकारणी शरदचंद्र पवार यांनी जन्माला घातलेला राष्ट्रवादी पक्ष. महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजन समाज, तसेच बहुजन समाजावर आधारित असलेल्या विविध संघटना यांचे कधी छुपे, तर कधी उघड पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांना मिळत गेलेले आहे. आज बहुजन समाजाची पाळंमुळं राष्ट्रवादीने इतकी भक्कम केलेली आहेत, राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपलासुद्धा त्याची मुळे तोडणे शक्य होत नाही. हिंदुत्वाच्या मखमली गालिचावर छत्रपती शिवाजी मैदान (मुंबई) येथे जन्म घेतलेल्या शिवसेनेबरोबर धर्मनिरपेक्षतेचे बाळकडू प्यायलेल्या पुरोगामित्वाच्या विचाराची वज्रमूठ केलेल्या राष्ट्रवादीने सत्तेचं साटंलोटं केलं आणि गेली दोन-अडीच वर्षे राष्ट्रवादीची पाळंमुळं अधिक खोलवर रुजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

त्यात त्यांना यशही आले, हे मुळीच नाकारता येणार नाही. त्याचा परिणाम असा झाला, महाराष्ट्राची सत्ता मिळविण्यात, ती टिकविण्यात राष्ट्रवादीला जे यश मिळाले ते यश संपूर्ण देशाच्या राजकारणाचाही केंद्रबिंदू बनले आणि दिल्लीत सत्तेचा भरधाव सुटलेला अश्व (भाजपचा) अडविण्याचाही केंद्रबिंदू शरद पवारांच्या नेतृत्वाभोवती पिंगा घालू लागला. दोन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी आभार व्यक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, आभार व्यक्त केले, पण हे आभार व्यक्त केल्यानंतर काही तहाची बोलणी झाली असेल का? राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवीन स्थापन केलेली संघटना ‘स्वराज्य’ हे ‘ग्रहण’ का टाकलेला ‘खोडा’ आहे, याचे उत्तर येणारा काळ देणार आहे.

Nilam: