Earthquake | पश्चिम महाराष्ट्र भूकंपानं (Earthquake) हादरला आहे. सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तब्बल 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद भूकंप मापकावर झाली आहे. तसंच या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाजवळ पाच किमी खोलीवर होता.
सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज (16 ऑगस्ट) सकाळी 6.45 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. तसंच या भूकंपाचा केंद्रबिंदू हा कोयना धरणाजवळ 5 किमी खोलीवर असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे.
कोल्हापूर येथील चांदोली अभयारण्य येथे भूकंपाचे धक्के जाणवले. तसंच सातारा जिल्ह्यातील पाटण शहरात आणि आसपासच्या गावांमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोबतच कोयना धरण परिसरात आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत. मात्र, सुदैवानं या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी झालेली नाहीये.