प्रा. अशोक ढगे, अर्थतज्ज्ञ
सार्वजनिक जनजागृतीसाठी गणेशोत्सव सुरू झाला; परंतु आता गणेशोत्सवाच्या काळात एकट्या महाराष्ट्रात सुमारे वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. लाखो कार्यकर्ते हा उत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी अक्षरशः झटत असतात. कोरोनाने दोन वर्षं अतिशय साध्या पद्धतीने साजर्या झालेल्या गणेशोत्सवावरील निर्बंध या वर्षी उठवण्यात आल्याने बाजारात जल्लोष आणि चैतन्याचा प्रवाह सळसळत आहे.
देशभर आणि जगभर साजरा होत असलेला गणेशोत्सव हा चैतन्याचा आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव दहा दिवसांचा असला, तरी दोन-तीन महिने अगोदर त्याची तयारी सुरू होते. मूर्ती कोणती आणायची, सजावट कशी करायची, देखावा कोणता दाखवायचा, विसर्जन मिरवणुकीत कोणतं पथक आणायचं याचं नियोजन करावं लागतं. मागच्या वर्षी कोणत्या शहरांमध्ये कोणता देखावा चांगला झाला होता, तो देखावा आणायचा का याचं चिंतन केलं जातं. मंडळाच्या ढोल, लेझीम पथकाची तयारी करून घेतली जाते. विसर्जन मिरवणुकीतही काही मंडळं देखावे दाखवत असतात. सामाजिक एकात्मतेच्या भावनेतून गणेशोत्सवाची सुरुवात झाली असली, तरी हा केवळ सामाजिक उत्सव नसून, अर्थचक्रातली एक महत्त्वाची घडामोड झाली आहे. हा उत्सव आज लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन झाला आहे. गेली दोन वर्षं देशात कोरोनामुळे भयावह परिस्थिती असल्याने उत्सव अगदी जेमतेम झाला. परिणामी, या उत्सवावर जगणार्यांची उपासमार झाली.
यंदा परिस्थिती काहीशी निवळली असल्याने उत्सवाचं हे गाडं पुन्हा प्रवाही झालं आहे. लोखंड, तांबं, सोनं, चांदी, कागद, काच, कापड, लाकूड, माती, सिमेंट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, पानं, फुलं, फळं, धान्य, कडधान्य, साखर, तेल, तूप, दूध, दही आणि जवळपास सर्वच वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे या एका उत्सवाने संपूर्ण बाजारपेठच फुलून जाते. दोन वर्षांनंतर या वर्षी असं चित्र दिसलं आहे. मुंबईत दहा लाखांहून अधिक घरगुती गणपती असल्याचं सांगितलं जातं. यातल्या निम्म्याहून अधिक गणेशमूर्ती पेण परिसरातून येतात. त्या परिसरात या मूर्ती दोनशे रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असल्या, तरी विक्रेते या मूर्ती अनेक शहरांमध्ये साधारण दुप्पट दराने विकतात. मुंबईत उंच मूर्तींची स्पर्धा असते, तर पुण्यात भव्य-दिव्य मूर्तींची. काही मंडळांच्या मूर्ती, तर एक लाख रुपयांहूनही अधिक किमतीच्या असतात. महाराष्ट्रात किमान पन्नास हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. त्यामुळे मूर्तींची संख्या विचारात घेतली, तरी त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, हे सहज लक्षात येईल.
विशेष म्हणजे दर वर्षी अनेक कामगार उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशातून केवळ मोठ्या मूर्ती घडवण्यासाठी मुंबईत येतात. आता छोट्या शहरांमध्येही असे कारागीर तयार झाले आहेत. मूर्ती आणल्यानंतर सजावटही तितकीच महत्त्वाची असते. मखरांच्या किमती दोन हजारांपासून १५ हजारांपर्यंत आहेत. दोन वर्षांपूर्वी दिवसाला १० ते २० मखरं विकली जात. गेली दोन वर्षं परिस्थिती आणखी बिकट होती. या वर्षी मात्र परिस्थिती सुधारली आहे. मंडप व्यवसायही मोडकळीस आला होता. यंदा मात्र १५ दिवस अगोदरच मंडप टाकायला सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साध्या पद्धतीच्या मंडपाचा खर्च एक लाखाच्या घरात जातो. सजावट, रोषणाई आणि इतर खर्च धरून चार ते पाच लाख रुपयांचा खर्च सहज होतो. मोठ्या मंडळांमध्ये रोषणाईवरच लाखो रुपये खर्च केले जातात. मंडप उभारणं, सजावट हे अंगमेहनतीचं काम करणारे हजारो हात त्यात गुंतलेले असतात. दादरच्या ‘मीनाताई ठाकरे फूल मंडई’त गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये २० ते ३० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. गणेशोत्सवात राज्यभरच्या घाऊक आणि किरकोळ बाजारात हजारो ट्रक फुलं येतात, ती लाखो रुपयांना विकली जातात.
पूजासाहित्य, चौरंग, पाट, शोभेच्या वस्तू हे दादरसह राज्यातल्या अनेक बाजारपेठांचं वैशिष्ट्य. त्यातही पदपथावर विक्रीला ठेवलेली तोरणं, झालरी, मण्यांच्या माळा, पायपुसणी यांना गणेशोत्सवात प्रचंड उठाव असतो. यंदाही ही लगबग लवकर सुरू झाली. मुंबई, पुणे, नागपूर, इंदूर या मराठीबहुलांच्या शहरांबरोबरच अहमदाबाद, बेंगळुरु, हैदराबाद या शहरांमध्ये गणेशोत्सवात चांगला व्यवसाय होण्याची चिन्हं आहेत. रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आदी कच्च्या सामानाच्या किमती वाढल्याने गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मुंबई-ठाणे परिसरातल्या लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १५ हजारांच्या घरात आहे. पुण्यातल्या नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या सोळाशेच्या आसपास असली, तरी प्रत्यक्ष संख्या दहा हजारांपर्यंत असल्याचं स्थानिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते सांगतात. एकट्या पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ‘असोचेम’च्या मते अहमदाबादमधल्या सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या दोन हजार, तर नागपूरमधल्या मंडळांची संख्या दीड हजारांच्या घरात आहे. या संख्येत दर वर्षी पाच ते दहा टक्के वाढ होते. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आणि जुन्या मंडळांनी उत्सवकाळात होणार्या प्रचंड गर्दीमुळे मंडपांचा विमा उतरवण्याची पद्धत सुरू केली आहे. या माध्यमातून विमा व्यवसायात लक्षणीय वाढ होते.पुण्या-मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर अवलंबून न राहता मंडळं खासगी सुरक्षा व्यवस्था ठेवतात. सीसीटीव्ही बसवले जातात. सुरक्षा उपाययोजनांमुळे रोजगारनिर्मिती होते.
याशिवाय, फुलविक्रेते, खाद्यपदार्थविक्रेते, वाहतूक व्यवस्था आदींच्या माध्यमातून लाखो हातांना काम मिळतं. मुहूर्त पाहून होणार्या खरेदीमुळे वाहन आणि इलेक्ट्रॉनिक बाजारातली विक्रीही वाढते. सुमारे पन्नास मॉलमधून घेतलेल्या माहितीनुसार उत्सवादरम्यान वीस टक्के विक्री वाढण्याचा अंदाज ‘असोचेम’ने व्यक्त केला आहे. सार्वजनिक गणपतींना दागिन्यांनी मढवण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. आता तर या प्रथेला स्पर्धेचं रूप आलं आहे. गणेश मंडळांमध्ये गणेशमूर्तीवर अधिक दागिने चढवण्याची चुरस लागलेली दिसते. त्यामुळे उत्सवात सोने-चांदी, हिरे-मोत्याच्या दागिन्यांची मोठी उलाढाल होते. मुंबईतल्या काही ‘ड्रेसवाल्यां’चा कपडे भाड्याने देण्याचा व्यवसाय वर्षभर सुरू असतो; पण गणेशोत्सव जवळ आला, की कपड्यांचं घरगुती मखर, झालरी, झुंबर, छप्पर बनवण्याचं काम जोरात सुरू होतं. याला कोकणातल्या ग्राहकांकडून विशेष आणि ठरलेली मागणी असते. धारावीतल्या अनेक महिला घरच्या घरी वर्षभर गणपतीच्या कंठीसाठी मोत्यांच्या माळा करतात. या माळांवर पुढे बरीच प्रक्रिया होऊन बाजारात कंठी सजतात. एका सर्वेक्षणातल्या आकडेवारीनुसार, उत्सवकाळातली देशभरातली उलाढाल आता ४० हजार कोटींच्या पुढे पोहोचली असून दर वर्षी त्यात २० टक्के वाढ होत असते.
उत्सवासाठी परगावी, विशेषत: कोकणात जाणार्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे गणपती पहायला पुण्यात येणार्या इतर गावांमधल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याच काळात सार्वजनिक परिवहन सेवेचं उत्पन्न ४० टक्क्यांहून अधिक वाढतं. समारे २०० परदेशी पर्यटक याच काळात उत्सवासाठी पुणे मुक्कामी येतात. कृषी उत्पन्नाच्या बाजारपेठेत फुलं, फळं आणि नारळ यांची प्रचंड आवक होऊन, उठावदेखील असतो. हलवाई, मिठाईवाले आणि घरगुती व्यावसायिकांकडे प्रसादासाठी मोठी मागणी असते. सजावटीसाठी विद्युत रोषणाईच्या माळा, दिवे यांच्या व्यवसायात लखलखाट असतो. इलेक्ट्रॉनिक घरगुती वस्तूंना मागणी वाढते. छोट्या-मोठ्या वाहनांच्या खरेदीला गणरायाच्या आगमनाचा मुहूर्त शुभ मानला जातो. गणेशोत्सवासाठी जाहिराती, प्रायोजक मिळवून देणारे उद्योजक, त्यांचे प्रतिनिधी, जाहिरात व्यावसायिक हे अनेक बड्या मंडळांच्या अर्थकारणाचा कणा ठरतात. बांधकाम व्यावसायिकांसाठी हा उत्सव पर्वणी ठरतो. वृत्तपत्रात पूर्ण पान झळकणार्या जाहिरातींचे दर आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असतो. करमणुकीच्या क्षेत्रातले कलाकार, कंत्राटदार यांच्यासाठी हा काळ सुगीचा ठरतो. ध्वनिवर्धक आणि रोषणाईचे कंत्राटदार नवनव्या तंत्राद्वारे उत्सवी सहभाग वाढवतात.
उत्सवात जोम धरणार्या अर्थकारणाचा सजगतेने विचार केल्यास ते समाजाला उपयुक्त आहे, हीच बाब प्रकर्षाने जाणवते. पूजेचं तबक, त्यातलं साहित्य आणि मंडप ही एकात्मतेची प्रतीकं आहेत. मूर्तीसाठी शाडू, प्लास्टर हे गुजरातच्या कच्छ भागातून येतं. रंग मुंबईमध्ये तयार होतात तर कारागीर हे प्राधान्यानं पेण, अहमदनगर, कोल्हापूर भागातले असतात. हळदी-कुंकवाची पेव उत्तर प्रदेशातून तर नारळ, तांदूळ दक्षिणेकडून येत असतात. पूजेचे पाट, मखरं राजस्थानचे कलाकार बनवतात. गणेशचरणी हार फुले अर्पण करण्यासाठी, शेतकरी, वाहतूकदार आणि सजावटकारांची संघटित मालिका उपयुक्त ठरते. कृत्रिम फुलं पंजाबमधून येतात. मंडपासाठी ताडपत्री पश्चिम बंगालमधून तर बांबू वासे, आसाममधून येतात. या सर्व मानसिक, शारीरिक आणि आर्थिक गुंतवणुकीतून,उत्सवामध्ये अप्रत्यक्षरित्या समरसतेची भावना निर्माण होत असते. गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाचा किमान खर्च हा दोन लाखांच्या घरात असतो. शहर परिसरात घरगुती गणपतींची संख्या पाच लाखाहून अधिक आहे. घरटी सुमारे दोन हजार रुपये किमान खर्च होतो. ही आकडेवारी गृहित धरली तर पुण्यातल्या खर्चाचा आकडा एक हजार कोटी रुपयांहून अधिक होतो. राज्याचा विचार केला तर हा खर्च सुमारे वीस हजार कोटी रुपयांहून अधिक असतो.