महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची मान्यता
पुणे : पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागरचनेस विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. अंतिम प्रभागरचना सोमवारी (दि. २७ जून) प्रसिद्ध केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गट आणि गणांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या जुन्या रचनेप्रमाणे ७५ गट, तर पंचायत समितीचे १५० गण अस्तित्वात होते. नव्या रचनेनुसार ८२ गटांची निर्मिती झाली, तर त्याच्या दुप्पट १६४ गण तयार झाले आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभागरचनेवर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर १५० हरकती दाखल प्राप्त झाल्या. त्यावर १६ जून रोजी विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेऊन २२ हरकती स्वीकारल्या आहेत. उर्वरित हरकती नाकारल्या आहेत.
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेचे परिशिष्ट ४ व परिशिष्ट ४ (अ) तहसील कार्यालये, पंचायत समित्या, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर २७ जून रोजी प्रसिद्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.