बेलवाडीत तुकोबारायांच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण उत्साहात

ग्रामस्थांनी केले पालखीचे स्वागत : रिंगण सोहळ्यास वारकऱ्यांची प्रचंड गर्दी

प्रसाद तेरखेडकर / सागर शिंदे
बेलवाडी :
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने बुधवार सणसर गावचा मुक्काम करून, श्री संत तुकोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण सोहळा गुरुवारी बेलवाडी ता. इंदापूर येथील गावातील पालखी मैदानावर उत्साहात वातावरणात पार पडले. तर तब्बल दोन वर्षांनंतर पायी पालखी सोहळा होत असल्याने वारकर्‍यांनी वारीत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कोरोना काळात संत तुकोबारायांच्या पादुका देहू ते पंढरपूर महामंडळाच्या बसने घेवून जावे लागले. यंदाच्या वारीला प्रशासनाकडून पायी वारीसाठी परवानगी मिळाल्याने, संपूर्ण राज्यातील वारकरी मोठ्या उत्साहात आहेत. अशीच पायी वारी कायम सुरू राहावी यासाठी विठ्ठलचरणी वारकरी साकडे घालत आहेत. तसेच वारकर्‍यांची गावकरी चांगली सेवा करीत आहेत व वारकर्‍यांना पायी वारीची संधी मिळाककल्याने, आनंदी आनंद चोहीकडे आहे.
— बाळासाहेब मोरे
माजी अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख

यावेळी पालखीचे रिंगण सोहळ्यात आगमन होताच, बेलवाडीचे गावचे सरपंच माणिकराव जामदार, उपसरपंच रामचंद्र यादव, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. शुभम निंबाळकर, छत्रपती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे, विठ्ठल जाचक, दादासो गायकवाड, लक्ष्मणराव भिसे, शहाजी शिंदे, हनुमंत खैरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखी विश्वस्त व पालखीचे प्रमुख नितीन महाराज मोरे यांचा बेलवाडी गावकर्‍यांनी मानसन्मान केला.

रिंगण सोहळ्यात धनगर समाजाच्या मानाच्या मेंढ्यांची प्रथम प्रदक्षिणा झाली. त्यानंतर झेंडेकर्‍यांनी हरिनामाचा गजर करत रिंगण पूर्ण केले. त्या पाठोपाठ डोक्यावर तुळशीवृंदावन व पाण्याचा हंडा घेतलेल्या महिलांनी जयघोष करीत धावत आपले रिंगण पूर्ण केले. त्यापाठोपाठ विणेकरी यांनी ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’चा नामघोष करत रिंगण पूर्ण केले. तर मानाच्या अश्वांची पूजा पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे व तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व रिंगणामध्ये मानाच्या अश्वांनी धाव घेतली, त्यावेळी उपस्थित वारकरी व हरीभक्तांनी हरिनामाचा जयघोष केला. टाळ्यांचा कडकडाट केला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गोल रिंगण पार पडल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी पालखी बेलवाडी गावच्या मध्यवर्ती भागात नेण्यात आली. बेलवाडी तेथे दोन तास पालखीचा विसावा झाल्यानंतर, पुढील मुक्कामासाठी पालखी अंथूर्णे गावाकडे प्रस्थान केले.

तब्बल दोन वर्षांनंतर पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडल्याने, स्थानिक नागरिक व वारकरी यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. संपुर्ण बेलवाडी परिसर हरिनामाच्या गजरात नाहून निघाला. तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावल्याने रिंगण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांनी फुगड्यांचा आनंद लुटला तर पोलीस जवानांनी देखील वारकर्‍यांसोबत फुगड्यांचा फेर धरला होता. रिंगण सोहळ्यास उपस्थित तरुणांनी हातात पताका व पखवाज व टाळ घेवून वारीचा आंनद लुटला. बेलवाडी गावकर्‍यांनी वारकर्‍यांची मनोभावे सेवा केली. त्यामुळे पालखी विश्वस्त यांनी गावकर्‍यांचा मानसन्मान केला.

Nilam: