विश्वशांतीच्या शोधात
मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कृती आहे आणि त्या मानवाने निर्माण केलेली जीवनप्रणाली, भक्तीप्रणाली, उपासनाप्रणाली, विचारप्रणाली ही त्यांच्या संस्कृतीतून दिसून येते. भावनेच्या उत्क्रांतीबरोबर संस्कृतीच्या स्वरूपातही हळूहळू उत्कर्ष दिसून येतो आणि ही संस्कृती पुढच्या पिढीला अधिक उन्नत होण्यासाठी मार्गदर्शन करीत असते.
भारतीय संस्कृती जगातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी एक असून प्राचीन काळात इराणी, ग्रीक, शक, हुण, कुषाण आदी आक्रमकांनी; तसेच मध्ययुगात इस्लामी व इंग्रजी राज्यकर्त्यांची आक्रमणे होऊनही भारतीय संस्कृती आजही टिकून राहिली आहे. यांतील बहुतेक आक्रमकांना तिने त्यांच्या संस्कृतीसह आपणातच सामावून घेतले आहे. परिणामी, भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण बनली असून अनेक परस्परविरुद्ध आचार-विचारांचे दर्शन आपणास या संस्कृतीतून घडून येते. म्हणूनच ती विश्वात्मक संस्कृती बनली आहे. भारतीय संस्कृतीतील ही विविधता हेच या संस्कृतीच्या एकात्मतेचे सूत्र ठरले आहे. सत्य, शिव, सुंदर या मंगल तत्त्वांवर उभी असलेली ही संस्कृती आहे.
मोगलांच्या काळात मुस्लिम आक्रमकांनी अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली, तर काही मुस्लिम सत्ताधार्यांनी सांप्रदायिक सद्भावनेसाठी सतत प्रयत्न केले. ब्रिटिशांनी तोडा-फोडा आणि राज्य करा ही राजनीती वापरली व हिंदू आणि मुस्लिमांच्यात सतत असंतोष कसा राहील याची काळजी घेतली, तरीदेखील या देशात हिंदू आणि मुसलमान यांचे सहजीवन गेल्या कित्येक शतकांपासून सुरू आहे. भिन्न उपासना पद्धतीमुळे हिंदू आणि मुसलमान यांच्यात जवळीक निर्माण झाली नसली तरीदेखील अनेक हिंदू बांधव आजही सुफी संतांच्या दर्ग्यांना भेट देत असतात व भारतीय संस्कृतीच्या सहिष्णुतेचे दर्शन घडवीत असतात. मुस्लिम बांधवदेखील आपल्या उपासना पद्धतीशी इमान ठेवून भारतीय संस्कृतीशी समरस होताना दिसतात आणि जगाला सांप्रदायिक सद्भावाचा संदेश देत असतात.
मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कृती आहे आणि त्या मानवाने निर्माण केलेली जीवनप्रणाली, भक्तीप्रणाली, उपासनाप्रणाली, विचारप्रणाली ही त्यांच्या संस्कृतीतून दिसून येते. भावनेच्या उत्क्रांतीबरोबर संस्कृतीच्या स्वरूपातही हळूहळू उत्कर्ष दिसून येतो आणि ही संस्कृती पुढच्या पिढीला अधिक उन्नत होण्यासाठी मार्गदर्शन करीत असते. सगुण साकार आणि निर्गुण निराकार असे ईश्वराचे रूप या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे. पुढे याच विचारसूत्रांचे प्रतीकामध्ये रुपांतर झाले. उत्सवामुळे आचारांचे पालन करणे सहज व सोपे झाले. प्रतीकामध्ये बुद्धीचे वैभव दिसते, तर उत्सवात भावनांचा प्रवाह वाहताना दिसतो. भारतीय परंपरेतील सण-उत्सव आपण आचरणात आणतो, त्यामागे भारतीय संस्कृतीची विचारप्रणाली असते. भावपूर्ण अंतःकरणाने व एकात्म बुद्धीने जर उत्सव साजरे करण्यात आले तर हे उत्सव वैयक्तिकरीत्या सामाजिक जीवनात आनंद निर्माण करतात. तसेच जीवनातील दुःखाला, निराशेला बाजूला सारून नवीन आशा निर्माण होते. भारतीय संस्कृतीची दृष्टी त्या उत्सवाच्या उद्देशामागे लपलेली आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती एक आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे, असे म्हणावे.
संस्कार आणि संस्कृती यांचे नाते जिव्हाळ्याचे असल्याचे मानले जाते, म्हणूनच प्रत्येक देशाचे वेगळेपण त्या देशातील संस्कृतीद्वारे ध्यानात येईल. भारतासारख्या देशात भिन्न जाती धर्माचे लोक बंधुभावाने राहतात. विविधतेतील एकता हे या संस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे. वेद, उपनिषदे हा या संस्कृतीचा ठेवा आहे. संत-मंहतांनी कीर्तनाद्वारे समाजाचे प्रबोधन केले. समाजाच्या मनाची मशागत केली. भारतीय संस्कृती ही ज्ञान, भक्ती, कर्म, शौर्य आणि त्याग या आदर्शभूत पायावर उभी आहे. माणसाच्या मनाचा आणि शरीराचा विचार करणारा योग हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे. लहान वयात ही मूल्ये रुजल्यास देशासाठी आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य भारतीय संस्कृतीद्वारे होईल. सामाजिक जीवन समृद्ध झाले की, राष्ट्राची संस्कृती संपन्न होते. कुटुंब संस्थेच्या आदर्शभूत पायावर उभी असणारी ही भारतीय संस्कृती, ही जगाला दिशा देण्याचे कार्य करते आणि म्हणूनच ती विश्वात्मक आहे. अनेक ज्ञानी, योगी आणि कर्तृत्वसंपन्न व्यक्तीच्या आदर्शातून पिढ्यान्पिढ्या आदर्श व्यक्ती घडविण्याचे कार्य भारतीय संस्कृती करीत असते.
वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर एक स्वायत्त प्रमाणपत्र परीक्षा विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे याच्या माध्यमातून गेल्या ७ वर्षांपासून इयत्ता ९ वी, १० वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते आणि गुणवत्ता यादीत येणार्या यशस्वी विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची रोख पारितोषिके दिली जातात. आता तर डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती विद्यापीठ या नावाने २०१७ मध्ये विद्यापीठ सुरू झाले आहे. विश्वशांती या नावाने असणारे भारतातील हे पहिलेच विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी केवळ पदवीधर किंवा उच्च विद्याविभूषित एवढ्यापुरते मर्यादित न राहता हे विद्यार्थी म्हणजे खर्या अर्थाने शरीराने सुदृढ, बुद्धीने तल्लख, मानसिकदृष्ठ्या सक्षम आणि आध्यात्मिक उंची (Physically Fit, Intellectually Sharp, Mentally Alert & Spiritually Alert & Elevated) असणारे असतील. अशा विद्यार्थ्यांसाठी भारतीय अस्मिता आणि विश्वात्मक भारतीय संस्कृती या विषयावर ‘मूलभूत अभ्यासक्रम’ (Foundation Course) महाराष्ट्र शासनाने तयार करणे आवश्यक आहे. सध्या संस्थापातळीवर हेच कार्य विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे भारत करीत आहे.
अंतिम सत्याचा शोध घेणार्या ज्ञान, विज्ञान आणि सद्गुण याची पूजा बांधणार्या या संस्कृतीस पुढे स्वामी विवेकानंदांनी वैश्विक रूप देण्याचा प्रयत्न केला. शिकागोतील जागतिक धर्म परिषदेच्या व्यासपीठावरून स्वामी विवेकानंदांनी समस्त अमेरिकन जनतेला प्रेमाची हाक देऊन अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुंनो असा उच्चार करून भारतीय संस्कृतीचे वैश्विक रूप जगापुढे मांडले. ज्ञान आणि विज्ञानावर आधारलेली ही भारतीय संस्कृती २१ व्या शतकात जगाला मार्गदर्शन करेल. याबद्दल स्वामी विवेकानंदांना खात्री होती. त्याचप्रमाणे प्रज्ञाचक्षू समन्वयमहर्षी संत श्री गुलाबरावमहाराज यांनी भाकित केले होते की, ‘भारतीय संस्कृती ही वैश्विक असून ती सर्व धर्मांना सामावून घेऊ शकते व या संस्कृतीचे पुनरुत्थान होऊन ती सार्या विश्वाला व्यापेल.’
प्रा. डॉ. एस. एन. पठाण