पुणे : संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ अजरामर करणाऱ्या बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस यांच्या सुवर्ण स्मृतींनी रसिकजन भारावून गेले. निमित्त होते गंधर्व नाटक मंडळीच्या ११० व्या स्थापनादिनानिमित्त बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस यांच्या वंशजांच्या सत्कार समारंभाचे. यावेळी अनुक्रमे अनुराधा राजहंस, दिपक टेंबे आणि राहूल गोळे यांचा आज ज्येष्ठ संगीत नाटक कलावंत, संगीत रंगभूमीचे अभ्यासक आणि बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुश साखवळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रसिद्ध नाट्यसंगीत गायक रवींद्र कुलकर्णी, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे कोषाध्यक्ष नारायण भालेराव, सचिव अवंती बायस, विवेक काटकर आणि सावता माळी भवनचे व्यवस्थापक संतोष रास्कर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुश साखवळकर म्हणाले, नटसम्राट बालगंधर्व हे किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये काम करत होते. ३१ मे १९१३ रोजी त्यांनी विद्याहरण हे नाटक सादर केले. त्यानंतर कलावंत आणि किर्लोस्कर नाटक मंडळी यांच्यातील मतभेदांमुळे बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस यांनी किर्लोस्कर नाटक मंडळी सोडली.
त्यानंतर ५ जुलै १९१३ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गंधर्व नाटक मंडळीची स्थापना करण्यात आली. हा समारंभ बुधवार पेठेतील माळ्यांची धर्मशाळा अर्थात आत्ताचे सावतामाळी भवन या ठिकाणी झाला होता.