पुणे | Pune News – अपघातांच्या (Accident) घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, अपघाताच्या ठिकाणचा अभ्यास, चालकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण, तसेच उपाययोजना व कारवाई यावर कामाला सुरुवात केल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील काही दिवसांत शहरातील पीएमपी बसच्या अपघातांत वाढ झाली आहे.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झालेल्या ठिकाणांची पाहणी करून अपघाताची कारणे शोधण्यात येणार आहे. प्राथमिक अभ्यासामध्ये अशी २० ते २५ ठिकाणे आढळून आली आहेत. तेथे उपाययोजना करण्यासह आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत.
अपघात कमी करण्यासाठी चालकांना प्रशिक्षण आणि प्रबोधन करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामध्ये पीएमपीचे निवृत्त अधिकारी व आतापर्यंत एकही अपघात न केलेल्या चालकांमार्फत सध्याच्या चालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
चालकांना प्रशिक्षण
केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेमार्फत (सीआयआरटी) तीन दिवसांचे प्रशिक्षण चालकांना दिले जाणार आहे. चालकांकडून नियमभंग झाल्यास दंडात्मक कारवाई केली जात होती. पण यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे. अपघातामध्ये चालकाची चूक असेल तर त्यांना निलंबितदेखील केले जाणार आहे, असे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.