लक्षवेधी |
प्रयत्नातील सातत्य, अंगीकृत कार्यावरील अढळ निष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द असली की, सामान्य व्यक्तीही असामान्य कर्तृत्व गाजवू शकते. त्याचं एक उत्तुंग उदाहरण म्हणजे, ख्यातनाम स्थापत्य विशारद रावसाहेब तथा आर. बी. सूर्यवंशीसाहेब होय. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन व टेक्नॉलॉजी लि., पुणे या कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. ते शिर्के ग्रुपच्या मुख्य व्यवस्थापन समितीचे सदस्य असून, या कंपनीत गेली साठ वर्षे, वयाच्या ८३ व्या वर्षी, आजही तरुणाला लाजवेल अशा तडफेने अखंड सेवेत आहेत.
कोल्हापूरचे भूमिपुत्र असलेल्या आर. बी. एस.साहेबांचा जन्म २ ऑगस्ट १९३९ चा. बालपण आणि प्रारंभीचे शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्यांचे कुटुंब शुक्रवार पेठेत (रंकाळावेस) राहायचं. कुटुंब तसं मोठंच. वडील कोर्टात नोकरीला. अशा सर्वसामान्य कुटुंबात, खडतर परिस्थितीत त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी तडक पुणे गाठलं! तेथे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्याच्याच बी. जी. शिर्के या बांधकाम क्षेत्रातील नामवंत कंपनीत ८ ऑगस्ट १९६३ रोजी रुजू झाले ते आजपर्यंत ! त्यांच्या एकूण आयुष्याला कलाटणी देणारी ही घटना.
शिर्के कंपनी ही बांधकाम क्षेत्रात झपाट्याने पुढे येणारी कंपनी. संस्थापक बी. जी. शिर्केसाहेबांच्या (बाबा) समर्थ मार्गदर्शन व द्रष्ट्या नेतृत्वाखाली कंपनीची चौफेर प्रगती सुरू झालेली. दूरदृष्टीच्या शिर्केसाहेबांनी प्रीफॅब तंत्रज्ञानाचा वापर करून सिव्हिल इंजिनिअरिंगचे संपूर्ण औद्योगिकीकरण साध्य करण्याची प्रक्रिया १९७३ पासून गतिमान केली होती. त्यातूनच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीची मुबलक घरे उपलब्ध करून शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाच्या धोरणास लक्षवेधी मदत केली.
दरम्यान, याच काळात कोल्हापूरच्या मातीची रग आणि धग रक्तातच भिनलेल्या आरबीएससाहेबांच्या कर्तृत्वाला धुमारे फुटू लागले. त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेत पूर्तता याबाबत ते नेहमीच काटेकोर राहतात. त्यांच्या व्यवस्थापनाकडून वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशनसाठी अनेक वर्षे प्रायोजकत्व स्वीकारून, नव्या कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांना योग्य प्रकारे ट्रेनिंग दिले जाते. या क्षेत्रात त्यांचे हे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर स्वतःला कालानुरूप अपडेट ठेवण्यात ते दक्ष असतात.
आपल्याकडील माहिती, ज्ञान आणि कौशल्ये यांची देवाण-घेवाण केल्यानेच बांधकाम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान व विकासपर्व गती घेईल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. शिर्के कंपनीने आजवर देश-विदेशात उभारलेले अनेक भव्य बांधकाम प्रकल्प हे आरबीएससाहेबांनी घेतलेले अथक परिश्रम, धडाडी आणि कल्पकतेची साक्ष देतात! त्याची संपूर्ण यादी हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. सहज उदा. म्हणून, बंगळूर आणि बेळगाव येथील ‘विकास सौध’ आणि ‘सुवर्ण विधानसौध’ या बहुचर्चित बांधकामांचा उल्लेख करता येईल.
या भव्य प्रकल्पांमध्ये दगडातील प्राचीन द्रविडीयन मंदिर वास्तुशिल्प बांधकामकलेचे पुनरुज्जीवन करण्यात आरबीएससाहेबांचा सिंहाचा वाटा आहे, तर ‘पुणे कन्स्ट्रक्शन- इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी ‘शिक्षण आणि प्रशिक्षण’ देण्यासाठी ते अविरत पाठपुरावा करीत आहेत. हे एवढ्यावर थांबत नाही, अभियांत्रिकी व आर्किटेक्चरच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी बांधकाम उद्योगातील समस्यांवर उपाय शोधणे, नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. तसेच शिर्के उद्योगसमूहाच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ‘शिर्के लर्निंग अँड ट्रेनिंग सेंटर’ सुरू करून, कंपनीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य व ज्ञान अद्ययावतरीत्या वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजिली जातात.
आपल्या नेहमीच्या कामाचा भाग म्हणून ते सामाजिक बांधिलकी कायम जपतात.मागास, अप्रगत, मूक-बधिर आणि मतिमंद मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ते पुढाकार घेत आले आहेत. पर्यावरणसंरक्षणाकडे ते कटाक्षाने लक्ष देतात. त्यांच्या आजवरच्या या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा अनेक प्रतिष्ठित संस्थांनी पुरस्कार देऊन जाहीर गौरव केला आहे. आरबीएस हे नेहमीच नावीन्याचा ध्यास घेतलेले आणि सतत शिकण्याचा सकारात्मक आग्रह धरणारे, पद्मश्री बी. जी. शिर्केसाहेबांच्या उद्यमशील विचारांचा वसा घेतलेले आपल्या नित्याच्या वागण्या-बोलण्यातून नव्या पिढीला तसा संदेश देणारे, चैतन्यदायी ऊर्जास्रोत आहे, हे निश्चित.
लक्षवेधी | राहुल साळोखे
असि. प्रोजेक्ट मॅनेजर,
बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन &
टेक्नॉलॉजी कं. लि., पुणे.