दहा प्रकारच्या मानसिकतेतून होतो मुलांचा बौद्धिक विकास

मेंदू हेच आपल्या जीवनाला, व्यक्तिमत्त्वाला, भविष्याला आकार देणारे अनाकलनीय यंत्रच आहे. त्यामुळे आपणसुद्धा त्याची हळूहळू जास्तीत जास्त माहिती मिळविणार आहोत. मेंदूविकासाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चार टप्पे पडतात. पहिला टप्पा जन्मापासून सहा वर्षांपर्यंतचा असतो. दुसरा टप्पा सहा वर्षे ते बारा वर्षांचा असतो. तिसरा टप्पा तेरा वर्षे ते वीस वर्षांचा असतो. चौथा टप्पा एकवीस वर्षांच्या पुढे असतो. हे चार टप्पे मेंदूची कार्यपद्धती, मेंदूतून स्रवणारी रसायने, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर पडणारे परिणाम आणि विविध परिस्थितीला दिला जाणारा प्रतिसाद यावरून पडलेले आहेत.

मेंदूविकासाच्या पहिल्या टप्प्याला बाल्यावास्थेतील मेंदूविकासाचा टप्पा असेही म्हणतात. मानवाच्या मेंदूविकासाचा सर्वात महत्त्वाचा हा कालखंड असतो. मेंदूतील न्यूरॉन्सच्या जोडण्याचा सर्वात जास्त वेग हा याच वयोगटात असतो. म्हणजेच मुलांच्या बौद्धिक विकासाचा पाया ० ते ६ या वयोगटात भरला जातो. मेंदूविकासाचा जितका पाया अधिक मजबूत तितका पुढे मेंदू अधिक ग्रहणक्षम बनतो. मुलांची शारीरिक आणि मानसिक सक्षमता याच वयोगटात अधिक निर्माण होत असते. त्यामुळे पालकत्वाच्या दृष्टीने मुलांचा ० ते ६ वयोगट हा अधिक संवेदनक्षम वयोगट आहे. याचा खूप जास्त प्रतिकूल परिणाम मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक कौशल्यावर पडतो.

परंतु बहुतांश पालकांनी जसे पालकत्वाचे अनुभव घेतलेले असतात, परिसरात, शेजारी, मित्रपरिवार, नातलग यांनी जसे पालकत्व निभावलेले असते त्याप्रमाणे किंवा आपल्याला जे योग्य आणि सोयीस्कर वाटते, तसे आपण पालकत्व निभावतो. विविध कृतीमधून मेंदूतील न्यूरॉन्सच्या जोडण्या होणे ही मेंदूची, मुलांच्या बौद्धिक विकासाची गरज असते. परंतु आपण असे वातवरण मुलांना देतो का? मुलांची बडबड सातत्याने सुरूच असते, पण कधी आपण लक्षपूर्वक ऐकतो का? या वयोगटात मुलांच्या दहा प्रकारच्या मानसिकतेमधून न्यूरॉन्सच्या जोडण्या म्हणजेच बौद्धिक विकास जास्त होत असतो. मग पालकत्व म्हणजे काय? नैसर्गिकपणे विकसित होणार्‍या मेंदूला खत-पाणी घालणे म्हणजे पालकत्व की, आपल्या मर्जीनुसार बालकांना वातावरण पुरविणे म्हणजे पालकत्व.

सर्वात गंभीर बाब म्हणजे मेंदूविज्ञान आणि आधुनिक पालकत्वाचे नॉलेज नसल्यामुळे, मुलांची सुरक्षितता व आरोग्य, पालकांचे स्टेटस आणि व्यस्त कार्यक्रम, पालकांचा स्वभाव, पालकांच्या आवडीनिवडी यामुळे चुकीचे संस्कार तर होत नाहीत ना? याचा परिणाम मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्सच्या जोडण्या कमी होण्यावर तर होत नाही ना? याचा गांभीर्याने विचार सर्व पालकांनी करणे आवश्यक आहे.

अशोक सोनवणे
सायकॉलॉजिस्ट लेखक, मेंदूविज्ञान

Nilam: