‘ठिपका’ असल्याच्या जाणिवेने पाय जमिनीवर

आज मी माझी रिक्षा ही थेट अवकाशात घेऊन जाणार आहे बरं का, त्याला कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी जेम्स वेब टेलिस्कोपने संपूर्ण मानवजातीला एक अद्भुत अशी भेट दिली. ही भेट म्हणजे वेब्ज फर्स्ट डीप फिल्ड (Webb’s Deep Field) आपल्या ब्रह्मांडाची म्हणजेच अवकाशविश्वाची घेतलेली प्रतिमा. हे डीप स्पेस छायाचित्र घ्यायला जेम्स वेब टेलिस्कोपला तब्बल १२ तास फ्रेम रेकॉर्ड करावी लागली आणि त्यानंतर ह्या आपल्या कल्पनेपलीकडे असणाऱ्या गूढ विश्वाचे चित्र समोर आले.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, ही हबलनंतरची जगातील सर्वात शक्तिशाली अवकाशीय दुर्बीण आहे. मागच्या वर्षी २५ डिसेंबरला या दुर्बिणीचे प्रक्षेपण करण्यात आले होते. नासासोबतच युरोपियन स्पेस एजन्सी व कॅनेडियन स्पेस एजन्सी यांनीसुद्धा या मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. या दुर्बिणीद्वारे SMACS 0723 हे पहिले छायाचित्र आपल्या समोर आले. ह्या चित्रात आपल्याला अनेक दीर्घिका (Galaxy) दिसतात. ही आपल्या विश्वाची सर्वात सुंदर, आणि हाय रेजोल्युशन प्रतिमा आहे. गंमत म्हणजे, आपल्याला फोटोत दिसणारा भाग हा विश्वाचा एका गव्हाच्या दाण्याइतकाच भाग आहे आणि त्यात या असंख्य दीर्घिका सामावलेल्या आहेत.

या छायाचित्रात आपल्याला जे चमकणारे बिंदू दिसतात, ते दीर्घिकेमधील तारे असून प्रतिमेचे मूळ आकर्षण असणारे वक्राकार दिसणारे आकार म्हणजे सर्व दीर्घिका आहेत. परंतु ह्या चित्रात दिसणाऱ्या या हजारो दीर्घिका आपल्यापासून काही अब्ज प्रकाशवर्षं दूर आहेत. प्रकाशवर्ष अंतराळातील अंतर मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. अंतराळातील अंतर मोजण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेले एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाचा किरण एका वर्षात किती प्रवास करतो, यावरून ते मोजले जाते.

जेम्स वेबने घेतलेल्या छायाचित्रातील प्रकाश हा १३ अब्ज वर्षं जुना आहे, तर विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचा सिद्धांत सांगतो की, १३.७५ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती करणारा महास्फोट म्हणजेच बिग बँग झाले होते. याचा अर्थ नासाने प्रकाशित केलेली छायाचित्रे आपल्याला विश्वनिर्मितीच्या अगदीच जवळ नेऊन सोडत आहेत.

या अवकाशाचे कुतूहल मला लहानपणापासूनच अचंबित करत आले आहे. लहानपणी तासन्‌तास आकाशाकडे पाहत असताना मला हे अथांग आकाश एका तलावासारखे भासत आले. फक्त मला या नितळ पाण्याच्या डोहात स्वतःचे नाही, तर दूरवर पसरलेल्या विश्वाचे प्रतिबिंब दिसत होते. आपल्याबरोबरच इतर ग्रहांवर मानवी वस्ती असेल का अथवा जीवसृष्टी असेल का, असेल तर ती कशी असेल असे असंख्य जिज्ञासू प्रश्न त्यावेळी पडत असत. वेब्ज डीप फिल्डमुळे आज हे चित्र स्पष्ट व्हायला मदत झालेली आहे.

या घटनेमुळे मला काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा आठवला. माझा दुसरा विमानप्रवास. पहिल्या विमानप्रवासाची मजेदार गोष्ट पुन्हा केव्हातरी. आयुष्यात एकदातरी हा विमानप्रवास अनुभवावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु हे स्वप्न पूर्ण करताना आपला खिसा आडवा येतो. प्रत्यक्षात हे स्वप्न जेव्हा खरे होते तेव्हा नकळतच अंगावर मूठभर मांस चढतेच. सुदैवाने मला ह्या अडचणीला कधीच तोंड द्यावे लागले नाही.

साऊथ कोरियामधून मायदेशी परतत असतानाची ही छोटीशी गोष्ट. विमान आकाशात उंचच उंच उडत असताना अचानक माझे लक्ष बाहेर गेले आणि दूर कोसावर असलेले एक विमान मला दिसले, अगदी एक टिंब. लागलीच मला देऊळ चित्रपटातील एक वाक्य आठवले. रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघत असताना अण्णा केशवला म्हणतात, ‘त्या काळाच्या पटावर तू आणि मी एक ठिपका असतो ठिपका.’ आपण, आपली पृथ्वी ह्या अवाढव्य ब्रह्मांडातील फक्त एक ठिपका आहोत. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन म्हणतो तसा, Pale Blue Dot!! ही कालपरवाची मानवी जीवनाचा उलगडा करणारी घटना असो अथवा हा छोटा अनुभव या दोघांनीही मला या विश्वातील माझे अस्तित्व अधोरेखित केलेय. एक ठिपका. या जाणिवांनी मला नेहमीच जमिनीवर आणून सोडलेय.

दीक्षा दिंडे | girlonthewingchair@gmail.com

Dnyaneshwar: