वृद्धांना एकटेपणा वाटू नये म्हणून दोनवेळेचा जेवणाचा डबा घरपोच सेवा
इंदापूर : वृद्ध आश्रमामध्ये अतिशय उत्तम सेवा मिळत आहे. मात्र तेथील वृद्धांच्या चेहर्यावर काही केल्या समाधान दिसत नाही. एक पराभूत मानसिकता कशानेही घालवता येत नाही. केवळ जवळची माणसे आपल्या सोबत नाहीत या कल्पनेने इथला माणूस निर्धारित आयुष्यापेक्षा लवकर मरतो. कुटुंबाने घराबाहेर काढू द्यात, पण किमान आपल्या गावात राहता आले पाहिजे, ओळखीच्या माणसात असलो तर एकटेपणा निघून जातो. या विचारधातून इंदापूर तालुक्यातील कामधेनु सेवा परिवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मणराव आसबे यांनी वृद्धाश्रमाला पर्याय काढत, आपल्या सेवा परिवाराच्या वतीने दोन वेळेचा जेवणाचा डब्बा त्या वृद्धांना घरपोच सुरू केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मणराव आसबे म्हणाले, की, ज्या वृद्धांचा सांभाळ नातलग करू शकत नाहीत किंवा जे निराधार वृद्ध आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता, किमान आपल्या गावात ओळखीच्या माणसात राहुन, एकटेपणा निघून जातो, हा एकटेपणाच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत वृद्धांनी व्यक्त केली. ही वाक्ये माझ्या हृदयात घर करून बसली आणि विचार सुरू झाला की वृध्दाश्रमाला पर्याय निघू शकतो. इंदापूर तालुक्यातील एका खेड्यात मी व्यवसायाच्या निमित्ताने गेलो होतो. ज्या वस्तीवर मला जायचे होते, तेथे अरूंद रस्ता होता. पावसाची रिमझिम चालू होती आणि तशा पावसात ७० ते ७५ वर्षांची एक वृद्ध महिला वेड्या बाभळीच्या वाळलेल्या काठ्या गोळा करत होती, हॉर्न बराच वेळ वाजवला. तिला रस्त्यातून दूर व्हायला पाच मिनिटे लागली. शंभर फूट अंतरावर मला जायचे घर होते, मी गाडीतून खाली उतरलो आणि शेजारीच असलेल्या एका पडक्या घराने माझे लक्ष वेधून घेतले.
भविष्यात सर्वांच्या सहकार्याने वृद्धाश्रमात मिळणाऱ्या सर्व सुविधा अशा गरजू आईवडिलांना आपण पुरवू शकतो. आज मला तो पर्याय सापडला.ज्यांना कोणीच नाही किंवा ज्यांना मुले सांभाळत नाहीत अशा लोकांना आपण त्यांच्याच गावात दोन वेळच्या जेवणाची सोय करायची.
— डॉ. लक्ष्मणराव आसबे
एक ८० वर्षांचा अजोबा अंथरूणावर झोपलेले होते, चार पाच मोडकी तोडकी भांडी आणि चूल घराला दरवाजा नाही, वर पत्रा आणि मागची भींत पडलेली. मी शेजारच्या माणसाला बोलाविले आणि चौकशी केली, त्यावेळी कळाले की, यांना दोन विवाहित मुले आहेत. त्याच गावात राहतात, त्यांनी आपल्या जन्मदात्या आईवडीलांना घराच्या बाहेर हाकलले आहे. वार्धक्यामुळे काम करता येत नाही. म्हणून मागून उदरनिर्वाह चालू आहे.
यांच्यासाठी दोन वेळच्या जेवणाची सोय करायचा संकल्प केला. यांना दोन वेळचा जेवणाचा डबा कोण देईल का? याचा शोध सुरू झाला. कामधेनु सेवा परिवाराच्या लाभार्थी असलेल्या भगिनी त्या गावात होत्या, पण त्या दूर वस्तीवर रहात होत्या. मग त्यांच्या शेजारीच राहणारी एक भगिनी दररोज दोन वेळचा जेवणाचा डबा द्यायला तयार झाली. मग एका व्यक्तीला महीना दिड हजार असे दोघांचे मिळून तिन हजार, असे ठरवून दिले. आणि लगेच ते हयात आहेत तोपर्यंत एका आईवडिलांची सेवा करण्याचे सौभाग्य कामधेनु सेवा परिवाराला लाभले.
भविष्यात सर्वांच्या सहकार्याने वृद्धाश्रमात मिळणार्या सर्व सुविधा अशा गरजू आईवडिलांना आपण पुरवू शकतो. आज मला तो पर्याय सापडला. ज्यांना कोणीच नाही किंवा ज्यांना मुले सांभाळत नाहीत. अशा लोकांना आपण त्यांच्याच गावात दोन वेळच्या जेवणाची सोय करायची. त्याच गावात खानावळ लावायची आणि दर महिन्याला त्याचे पैसे द्यायचे.
कामधेनु सेवा परिवार गेल्या १४ वर्षांपासून अकाली विधवा झालेल्या महिलांना बहीण म्हणून जोडतो, त्यांच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंत शालेय शिक्षणासाठी दत्तक घेतो आणि दिवाळीला या सर्वांची भाऊबीज करतो. हजारो सर्व जाती धर्माच्या महिलांना आणि मुलांना कामधेनु सेवा परिवार हा आधार झालेला आहे.
आज वृद्धांच्या सेवेचे पहिले पाऊल पडत आहे. आपणा सर्वांना आवाहन करतो आहे,की आपल्या कोणाला या वृद्धांची सेवा करायची असेल तर आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त, आईवडिलांच्या स्मरणार्थ या वृद्धांना जेवढे शक्य असेल तेवढे अन्नदान करूया.ज्यांना यात सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी अध्यक्ष कामधेनु सेवा परिवार. मो. ९८२२२९२७१३ यावरती संपर्क साधावा असे आवाहन कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.