केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचे सीन्सही गायब; ‘द केरळ स्टोरी’चा नेमका वाद कशावरून?

The Kerala Story | निर्माते विपुल अमृतलाल यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर खासदार शशी थरूर यांनी सुद्धा पुरावे देण्यास सांगितले आहे. केरळमधील मुस्लिम संघटनांनी दावे सिद्ध केल्यास 1 कोटी देण्याचे चॅलेंज दिले आहे. तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एक दोन नव्हे तर दहा सीन्सवर कात्री चालवली आहे. यामध्ये केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचाही सीन आहे. ते मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंद असल्याचं म्हटलं जात आहे.

चित्रपटातून डिलिट केले सीन्स

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातील इतर काही सीन्स ज्यांमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला आहे, असे सीन्सही सेन्सॉर बोर्डाने हटवले आहेत. त्याच्याशी संबंधित काही डायलॉग्सवरही कात्री चालवली आहे. ‘भारतीय कम्युनिस्ट्स हे सर्वांत मोठे ढोंगी आहेत’ या डायलॉगमधील भारतीय हा शब्द हटवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचे सीन्सही काढून टाकण्यात आले आहेत. या सीनमध्ये ते म्हणतात, “केरळ पुढील दोन दशकांत मुस्लिम बहुल राज्य बनेल. कारण इथल्या तरुणांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रभावित केलं जातंय.” सेन्सॉर बोर्डाने ही संपूर्ण मुलाखतच चित्रपटातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

नेमका वाद कशावरून?

‘द केरळ स्टोरी’च्या टीझरमध्ये 32 हजार महिलांचा उल्लेख करण्यात आला होता. केरळमधील 32 हजार महिलांचं धर्मपरिवर्तन करून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतल्याचं म्हटलं होतं. यावरूनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची मागणी केली आहे. सीपीएम आणि काँग्रेसने चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका मांडली. तर दुसरीकडे वितरकांनी त्यांचा वेगळा मुद्दा मांडला. जरी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही तरी त्याला ओटीटीवर असंख्य प्रेक्षक पाहतील. त्यामुळे तो थिएटरमध्येच प्रदर्शित करावा, असं ते म्हणाले.

Dnyaneshwar: