‘द केरळ स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटावरून शशी थरूर यांचं खुलं आव्हान; म्हणाले, “…पुरावे सादर करा अन् 1 कोटी न्या”

मुंबई | The Kerala Story – नुकताच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’चा (The Kerala Story) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला केरळ सरकरानं संघ आणि भाजपचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. तर यावर काँग्रेसकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी ही आमची केरळ स्टोरी नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आताही शशी थरूर यांनी या चित्रपटाबाबत आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी लोकांना खुलं आव्हान दिलं आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना बळजबरीनं धर्मांतरित करून ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या स्टोरीवरून वाद निर्माण झाला आहे. याबाबत आता काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट केलं आहे.

शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “केरळमधील 32,000 महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्यांनी हा दावा सिद्ध करावा आणि पैसे कमवावे, ही त्यांच्यासाठी एक संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत कारण कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत?”

पुढे शशी थरूर यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये “केरळमधील 32,000 महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि 1 कोटी रूपये न्या”, असं त्यांनी लिहिलं आहे. तसंच ‘नाॅट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. थरूर यांच्या पोस्टनुसार ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रूपयांचं बक्षीस मिळवायचं आहे ते 4 मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.

Sumitra nalawade: