महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरणार नाव

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच भाजपने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे केंद्रीय निरीक्षक राज्यात येणार असून ४ डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अजून मुख्यमत्र्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे निश्चित असले तरी कोण होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.  महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी भाजपच्या गोटातून हालचाली वाढल्य़ा आहेत. मुंबईत व दिल्लीत महायुतीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटाने त्यांच्या विधीमंडळाच्या नेत्यांची निवड केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या विधीमंडळ नेत्याची  पक्षाच्या निरीक्षकाकडून निवड केली जाणार आहे. यासाठी भाजपने निरीक्षकांची निवड केली आहे. भाजपने आधीच स्पष्ट केले आहे की, जो नेता विधीमंडळ नेतेपदी निवडला जाईल तोच मुख्यमंत्री असेल. 

भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व कुणाला निरीक्षक म्हणून पाठविणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. कारण शीर्षस्थ नेतृत्वाकडून निरीक्षकांना नेता निवडीबाबत संदेश दिलेला असणार हे उघड आहे. ज्या नेत्याची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड होईल, तोच नेता राज्याचे नेतृत्व करणार आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील?

राज्याच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शविल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर संबंधित नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यासाठी भाजपकडून दोन पक्षनिरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  

Rashtra Sanchar: