बदलत्या काळात कारकिर्दीची अनेक नवनवी क्षेत्रं उदयाला येत आहेत. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना असायला हवी. शिवाय पालकांनीही अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यातून दहावीनंतर कला, वाणिज्य का विज्ञान या ठरावीक प्रश्नाचा विचार करण्याऐवजी कारकिर्दीच्या काही हटके वाटांवरून वाटचाल करता येईल. शिवाय दहावीत अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांसाठीही विशेष कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
महेश जोशी
आजघडीला विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्रं खुली झाली आहेत. रस असेल त्या क्षेत्रामध्ये अतुल्य कारकीर्द घडवण्याची संधी आणि सुविधा विद्यार्थ्यांना मिळू शकते. इच्छा आणि कष्ट घेण्याची तयारी, अथक अभ्यास आणि चिकाटी या बळावर विद्यार्थी हवं ते सगळं प्राप्त करु शकतात. ‘अग्निपथ’सारखे अनेक नवे मार्ग त्यांच्यासाठी तयार होत आहेत. हे सगळं लक्षात घेता सध्याचा काळ योग्य निर्णय घेण्याचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या वर्षांचे निकाल विद्यार्थ्यांच्या पुढल्या कारकिर्दीची दिशा ठरवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे दहावी-बारावीच्या यंदाच्या निकालांना अधिक महत्त्व होतं. आता विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्रं खुली झाली आहेत. इच्छा आणि कष्ट घेण्याची तयारी, अथक अभ्यास आणि चिकाटी या बळावर विद्यार्थी हवं ते सगळं प्राप्त करू शकतात. ‘अग्निपथ’सारखे अनेक नवे मार्ग त्यांच्यासाठी तयार होत आहेत. हे सगळं लक्षात घेता सध्याचा काळ शांतपणे विचार करून, अवलोकन करून, स्वत:ची क्षमता ओळखून योग्य निर्णय घेण्याचा आहे हे लक्षात घ्यायला हवं.
आता बरेच विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करतील. त्यात कोणी कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, यासंदर्भात सूचनांचा भडीमार होईल. आपल्या पाल्यानं ठरावीक शाखेमध्येच प्रवेश घ्यावा, असा आग्रह करणारेही अनेक पालक आहे, परंतु विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेनुसार आणि आवडीनुसार त्या त्या शाखेत प्रवेश घेणं यशस्वी कारकिर्दीच्या दृष्टीनं हिताचं ठरतं. दरवर्षी दहावी, तसंच बारावीच्या निकालादरम्यान या दोन परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्यांना कोणकोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल, त्याद्वारे कोणत्या क्षेत्रात किअर करता येईल याविषयी माहिती दिली जाते. परंतु त्यामध्ये साधारणपणे ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांचाच प्राधान्याने विचार केला जातो. मग याशिवाय दहावीत अनुत्तीर्ण होणार्यांचं काय, त्यांना दिलासा कसा द्यायचा, याचाही विचार आवश्यक ठरतो. वास्तविक, दहावीला ३५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवणार्या विद्याथ्यार्ंंची संख्याही मोठी असते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठीही कारकिर्दीच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत.
आयआयटीसारख्या संस्थांमध्ये अनेक कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कमी गुण असणारे विद्यार्थीही पात्र ठरू शकतात. याशिवाय काही खासगी संस्थोमध्येही अशा अभ्यासक्रमांचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं. एवढंच नव्हे तर, काही संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थींच्या निवासाची आणि भोजनाचीही व्यवस्था केली जाते. अलीकडे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात जाऊनच अशा संस्थांमध्ये शिक्षण घ्यावं, अशी परिस्थिती राहिलेली नाही किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करूनही प्रशिक्षणार्थी चांगलं उत्पन्न मिळवू शकतात.
त्याचबरोबर यशस्वी उद्योजक म्हणूनही पुढे येऊ शकतात. याशिवाय काही खासगी कंपन्यांच्या प्रायोजकत्वाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालवल्या जात आहेत. अशा संस्थांमध्ये प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणार्याना संबंधित कंपनीतच नोकरीच्या संधी प्राप्त होतात. त्यामुळे इतरत्र नोकरी शोधण्याचा आणि त्यासाठी भटकंती करत राहण्याचा प्रश्न येत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असेल आणि नोकरी करणं भाग असेल अशांसाठी यशवंतराव मुक्त विद्यापीठातही विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यापैकी आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम नोकरी करीत पूर्ण करता येतात. त्यासाठी दररोज, ठरावीक वेळ कॉलेजमध्ये जावंच लागेल अशी अट नसते. त्यामुळे नोकरी करून उरलेल्या वेळेत अभ्यास करून उत्तम यश मिळवता येतं. अलीकडे विविध उद्योगांच्या अल्प कालावधीतल्या प्रशिक्षणाची सोयही उपलब्ध आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यासाठी बँकांकडून अर्थसाहाय्यही मिळू शकतं. शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग यासारख्या व्यवसायांचा यात समावेश होतो. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कलागुण ओळखून त्या त्या गुणांना वाव देणार्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास उज्ज्वल भवितव्याची खात्री देता येते. उदाहरण द्यायचं तर चित्रकला उत्तम असणार्यांसाठी फाइन आर्टसला प्रवेश घेणं फायदेशीर ठरतं. फाईन आर्टसमध्ये डिप्लोमा पूर्ण करणार्यांना करिअरच्या विविध संधी मिळू शकतात. चित्रकला उत्तम असल्यास स्थापत्यकलेतही कारकिर्दीस वाव आहे.
मल्टिमीडिया अॅनिमेशनला वाढती मागणी आहे. साहजिक या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाला वाव असून, ती संधी अनेकांनी प्राप्त करून घ्यायला हवी. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले असतील तर अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. याचे दोन फायदे मिळतात. एक म्हणजे बारावीनंतर द्याव्या लागणार्या सीईटी, जेईई आदी परीक्षांपासून सुटका होते. दुसरा फायदा म्हणजे ही पदविका प्राप्त केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसर्या वर्षात प्रवेश घेता येतो. हा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणार्यांनाही खासगी कंपन्या, रेल्वे सेवा आदींमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. दहावीनंतर कारकिर्दीच्या दृष्टीनं होम सायन्स हाही उत्तम पर्याय आहे. या अभ्यासक्रमात विविध जीवनकौशल्यांचा समावेश असतो. होम सायन्सचा पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे. विशेषत: मुलींसाठी हा अभ्यासक्रम ही नामी संधी ठरते. विज्ञानाची आवड असणार्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनक्षेत्राचा मार्गही सोयीस्कर ठरू शकतो; परंतु त्यासाठी दहावीनंतर किमान दहा वर्षं शिकण्याची तयारी हवी. शिवाय ही वाटचाल पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळही महत्त्वाचं ठरतं. त्याचा विचार सुरुवातीलाच करायला हवा. या विभागात एम.एस्सी. तसंच पीएच.डी. या पदव्या घेऊन संशोधन करणंही शक्य आहे. कोणत्याही विद्याशाखेला प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यास यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षांना बसता येतं. या परीक्षांमध्ये तसंच नंतरच्या मुलाखतींमध्ये उत्तीर्ण होणार्यांना शासनात विविध महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळते.