मागील २० वर्षांपासून चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. कोंडी हटवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने वैतागलेल्या चाकणकर नागरिकांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे. खासदार साहेब आता तरी चाकणची कोंडी सोडवा, अशी मागणी करण्यात येत आहे; मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे की खासदार काम करीत नाही की विरोधात मतदान केले म्हणून मुद्दाम स्थानिकांना वेठीवर धरले जात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पुणे-नाशिक व तळेगाव शिक्रापूर या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी झाली आहे का? यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुगल मॅपवर माहिती घेऊन प्रवासाचा निर्णय घयावा लागतो, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चाकणमधील प्रवास नकोसा वाटत आहे. चाकण-शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने अवजड वाहनांसह चारचाकी, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सातत्याने सुरू असते. त्याचबरोबर कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या परिसरातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाला मिळत असतानाही या भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न अजूनही सुटला नाही. यामुळे याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसत असल्याने कंपन्या-उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय हमरस्त्यावर सातत्याने जाणवणार्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून महाराष्ट्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडी) चाकण बाह्यवळण मार्गाची रचना केली; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते काम प्रलंबित असून सध्या तरी वाहतूक कोंडीतून मार्ग शोधत इच्छितस्थळी पोहोचणे याशिवाय पर्याय नाही.